मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महिला आणि बालविकास योजनेअंतर्गत गरीब होतकरू महिलांना घरघंटी, शिलाई यंत्र आणि मसाला कांडप यंत्रांचे वाटप करण्यात येते. मात्र, अनेक पात्र महिलांना अद्याप या वस्तूंचे वाटप झालेले नाही. अनेक महिला डिसेंबर २०२४ पासून या यंत्रांच्या प्रतीक्षेत आहेत.

महानगरपालिकेच्या जेंडर बजेटअंतर्गत महिला व बालकल्याण योजनेतून पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी व मसाला कांडप आदी यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये अनेक पात्र महिलांनी अर्ज केले होते. मात्र, निवडणुकांमुळे संबंधित वितरण प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

निवडणुका होऊन अनेक महिने उलटले तरीही महिलांना यंत्रांचे वाटप झालेले नाही. याबाबत पात्र महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयातून काही महिलांना पात्रतेबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असून या महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह पात्रता पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे, संबंधित यंत्रसामुग्रीचे वितरण तातडीने करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यंत्रसामुग्रीचे वितरण केवळ महानगरपालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक ठिकाणीच करण्यात यावे, कार्यक्रमात कोणत्याही खासदार, आमदार, माजी नगरसेवक किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकारी/कार्यकत्यांचा हस्तक्षेप होऊ नये, कोणत्याही राजकीय नेत्यांच्या कार्यालयात किंवा त्यांच्या मालकीच्या सभागृहात वस्तूंचे वितरण करू नये, वितरणप्रक्रिया केवळ महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पार पडावी, अशी मागणी बहुजन आघाडीमार्फत करण्यात आली आहे.

तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या विभाग ‘ए’ ते ‘टी’मधील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याचीही मागणी वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी केली आहे.