कुठे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव, तर कुठे आरोग्य शिबीर, तर कुठे त्यांच्या स्वच्छतागृहाच्या हक्कासाठी मोहीम अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी मुंबईत ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला.
शहरात वावरताना महिलांना स्वच्छतागृहांच्या अभावी कराव्या लागणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पश्चिम उपनगरात ‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ ही मोहीमच सुरू केली. पक्षाच्या उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी या मोहिमेअंतर्गत महिलांकरिता ५० शौचालयांची सोय करण्याचे ठरविले आहे.
मनसेनेच ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या वतीने कॅन्सरशी लढा देण्यासाठी महिलांकरिता कर्करोग निदान शिबिराचे आयोजन केले होते.
महिलांमध्ये उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ऑपेरा हाऊसमधील डायमंड मार्केटमध्ये ‘महिला व्यापारपेठ’तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजीबाईंचा ‘रॅम्पवॉक’ आयोजिण्यात आला होता. यात ५० हून अधिक महिला गृहउद्योग निर्मित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. या महिला व्यापारपेठेतील उत्पन्न मुख्यमंत्री मदत निधीतील ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानाकरिता दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांचे जगणे समृद्ध करणाऱ्या असामान्य महिलांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रासाठी शबाना आझमी, साहित्याकरिता कविता महाजन, कलेसाठी फैय्याज, आरोग्याकरिता डॉ. इंदिरा हिंदूुजा, पत्रकारितेकरिता कुमुद संघवी-चावरे, क्रीडा क्षेत्रासाठी वीणा परब-गोरे आणि कृषिसंलग्न उद्योगात ठसा उमटवणाऱ्या अनुराधा देसाई यांना यावेळी गौरविण्यात आले. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्तेही २२ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.