किन्नरी जाधव, शलाका सरफरे विहीर आटलेली, पिकं करपलेली, जनावरांना द्यायचा चाराही संपत आलेला.. दसऱ्यापासूनच दुष्काळाचा अंधार असा घरभर व्यापून राहिलेला आणि त्यानं ‘घरखर्च भागवायचा कसा,’ हा प्रश्न अधिक गहिरा बनलेला. त्यामुळे रस्त्यांवर कंदील, पणत्या विकून शहरवासियांच्या घरात प्रकाश उजळविण्यासाठी अंधाराची सोबत घेत हे दुष्काळग्रस्त मुंबई, ठाण्यात आले आहेत. ‘‘सावकाराकडून दहा टक्के व्याजाने अवघे दोन हजार रुपये हातात घेतले आणि मुंबईत दिवे विकायला आलो. काही दिवस थांबू आणि माघारी फिरून आमची दिवाळी साजरी करू,’’ठाणे, मुंबईच्या बाजारात दिवे, कंदील विकण्यासाठी आलेल्या जोडप्याकडून दुष्काळग्रस्त गावांतील हे वास्तव ऐकल्यावर या दुष्काळाची दाहकता जाणवते. दिवाळीच्या सणासाठी आठवडाभर केलेल्या विक्रीतून किमान महिनाभराचा खर्च निघेल अशी अपेक्षा घेऊन आलेली अनेक कुटुंब सध्या ठाणे, मुंबईच्या बाजारात दिसत आहेत. या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून हाताशी थोडे पैसे घेऊन दुष्काळी गावांतील वस्त्या काही दिवसांसाठी का होईना प्रकाशमय होणार आहेत. दिवाळीच्या विक्रीसाठी ठाणे, मुंबईतील बाजारात काही दिवस आधीच विक्रेत्यांची गर्दी सुरू होते. आकर्षक सजावटीचे साहित्य, कंदील, पणत्या, रांगोळी विकण्यासाठी या शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये विक्रेते मोठय़ा संख्येने दाखल होतात. दुकानांबाहेर फेरीवाल्यांच्या रांगा लागतात. यंदाच्या दिवाळीत या नेहमीच्या विक्रेत्यांबरोबर दुष्काळी गावातून आलेल्या विक्रेत्यांची भर पडली आहे. औरंगाबाद, सोलापूर, पंढरपूर यासारख्या दुष्काळग्रस्त भागातून अनेक कुटुंबे व्यवसायासाठी ठाणे, मुंबईच्या बाजारात दाखल झाली आहेत. पावसाने ओढ धरल्याने पिकांचे झालेले नुकसान, आटलेल्या विहिरी यामुळे उदरनिर्वाहाची मोठी समस्या या दुष्काळग्रस्त गावांतील कुटुंबांसमोर आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सणांच्या काळात मिळणाऱ्या नफ्यासाठी या गावातून अगदी गर्भवती महिला आणि वयोवृद्ध नागरिकही गाव-खेडय़ांतून सावकाराकडून कर्ज घेऊन शहरांकडे आले आहेत. हे विक्रेते मुंबईतील मालाड, जोगेश्वरी येथे पणत्या, कंदिलांचा कच्चा माल खरेदी करून उपनगरांकडे विक्रीसाठी येत आहेत. दसरा कोरडा गेला असला तरी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी हातात तुटपुंजी रक्कम मिळेल, या अपेक्षेने ही कुटुंबे ठाण्यातील जांभळीनाका, वाशीतील सेक्टर नऊ, डोंबिवलीतील स्थानक बाजारपेठ आणि दादर या ठिकाणी पणत्या आणि कंदिलांची विक्री करताना दिसत आहेत. भल्या पहाटे कच्चा माल खरेदीसाठी मुंबईत जायचे आणि दुपारच्या वेळेत या कच्च्या मालावर कलाकुसर करून सायंकाळी विक्रीसाठी शहरातील बाजारपेठेत बसायचे, असा या मंडळींचा दिनक्रम आहे. लेकुरवाळ्या महिला पदपथांवर विक्री करताना आपल्या बाजूलाच तान्ह्य़ा बाळासाठी झोळी बांधून एका हाताने पाळण्याची दोरी हलवत दुसऱ्या हाताने पणत्या रंगवण्याचे काम करताना बाजारात दिसून येत आहेत. हे विक्रेते साधारण ५० ते ६० रुपयांना या पणत्या बाजारात विकत आहेत. सजावटीसाठी लागणारे लहान आकाराचे कंदील १०० ते १५० रुपयांना विकण्यात येत आहेत. पीक येत नसल्याने वर्षभराच्या धान्याचा प्रश्न असतो, दिवाळीनिमित्त शहरात विक्रीसाठी आल्यावर किमान काही पैसे हाती मिळतील, असे सोलापूरमधून आलेल्या महिला विक्रेत्या आशाबाई काळे यांनी सांगितले. गावात पाऊसच पडला नसल्याने शेतजमीन असली तरी पीक घेता येत नव्हते. अशा वेळी सण हाच रोजगारासाठी आधार असतो. काही दिवसांपूर्वी ठाण्यात आलो. जागा मिळेल तिथे झोपायचे, खायचे आणि दिवसा विक्री करायची. विक्री करून मिळालेल्या पैशात सावकाराचे कर्ज फेडायचे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या गावी परतायचे असे ठरवून शहरात व्यवसाय करायला आलो आहोत, असे ठाण्यात पणत्या विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्या पुष्पा पवार यांनी सांगितले. पालिकेच्या मैदानाचा आधार दुष्काळग्रस्त गावातून आलेल्या कुटुंबांना शहरात निवाऱ्याचा खर्च परवडत नसल्याने महापालिकेच्या मोकळ्या मैदानात त्यांनी काही दिवसांसाठी आपला संसार थाटला आहे. याविषयी महापालिका प्रशासनाकडे काही जणांनी तक्रारही केली. अतिक्रमण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना या कुटुंबांची पार्श्वभूमी लक्षात आली. त्यामुळे तक्रारींकडे कानाडोळा करत या दुष्काळग्रस्तांना दिवाळी होईतोवर मैदानांमध्ये तात्पुरता आश्रय दिला जात आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मात्र प्रशासनाने नकार दिला.