मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील सहा विभागांच्या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सहा विभागांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर १२ तासांच्या आत या कामांना सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांमधील विविध व्यवस्थांची, तसेच विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. तसेच सहा विभागांचे नूतनीकरण तातडीने सुरू करून ही कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी भेटीदरम्यान केल्या होत्या. या आदेशानुसार तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. सहा विभागांच्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बांधकामाच्या किरकोळ कामांना मंगळवारपासून सुरुवात झाली. ही कामे वेगाने व्हावीत, त्यांचा रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन दिवस-रात्र काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केल्या आहेत. यामध्ये विभाग क्रमांक ४, ४ अ, ६, ७, ११ आणि १२ चा समावेश आहे. याआधी या प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे करण्याचे नियोजित होते. तथापि, रुग्णशय्या पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर उपयोगात याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सहा विभागांचे काम एकाच वेळी हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबई: राणीच्या बागेत पर्यटकांपाठोपाठ आता वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थ्यांचीही हजेरी

हेही वाचा >>>उत्कृष्ट गुन्हे तपास पदक हुकल्याने पोलिसांमध्ये निराशा

प्रत्येक विभागामध्ये ६० ते ७० रुग्णांना सेवा देण्याची क्षमता आहे. नूतनीकरणानंतर या सहा विभागांच्या उपलब्धतेमुळे सुमारे ४२० रूग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. परिणामी, रूग्णालयातील सुविधांमध्ये भर पडतानाच रुग्णांसाठी अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करता येतील, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.