लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबईमधील आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून वन जमीन, मानवी हक्क आणि मणिपूरमधील आदिवासींना पाठिंबा देण्यासाठी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीच्या परिसरात मोर्चा काढण्यात आला आहे.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त निरनिराळे उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा जागतिक दिनाचे औचित्य साधून मुंबईमधील आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी आंदोलन पुकारले आहे. आरे जंगल, गोरेगाव चेक (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) नाका येथून १० वाजता मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाची आरे डेअरी येथे सांगता होणार आहे. आदिवासींवर होणारा अन्याय, भेदभाव आणि हिंसाचार विशेषतः मणिपूरमधील आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंबईतील आदिवासी पाड्यांची गावठाण म्हणून अधिकृत घोषणा करावी, त्यांना भारतीय संविधानाने अभिप्रेत असलेली स्वायत्तता आणि प्रतिनिधित्व प्रदान करावे, भारतीय संविधानानुसार आदिवासींना मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून अधिकृत मान्यता द्यावी आणि आत्तापर्यंत नाकारलेले जात प्रमाणपत्र जारी करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मार्चा काढण्यात आला आहे.