मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५५६ घरांचा ताबा रहिवाशांना काही दिवसांपूर्वी देण्यात आला असून रहिवासी नव्या घरात वास्तव्यास आले आहेत. मात्र त्यांना सध्या वाहनतळाची जागा अपुरी पडत असून त्यांची ही समस्या मार्च २०२६ मध्ये दूर होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीत सात मजली वाहनतळ बांधण्यात येत आहे. या वाहनतळाचे काम वेगात सुरु असून ते पूर्ण करून वाहनतळाचा ताबा मार्च २०२६ मध्ये देण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. सात मजली या वाहनतळामध्ये एकावेळेस २२०० गाड्या उभ्या करता येणार आहेत.

वरळी ही सर्वात मोठी बीडीडी वसाहत असून तेथे ९८६९ सदनिका आहेत. या ९८६९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार असून त्यांना ५०० चौ. फुटाची घरे दिली जात आहेत. पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १३ पुनर्वसित इमारती बांधल्या जात आहेत. या १३ इमारतींअंतर्गत ३८८८ घरे बांधली जात असून त्यातील ५५६ घरांचा ताबा काही दिवसांपूर्वीच रहिवाशांना देण्यात आला आहे. दरम्यान वरळीत ४० मजली इमारती असून तेथे एका घरामागे एका वाहनासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग पुनर्विकासाअंतर्गत दोन घरांमागे एका वाहनासाठी जागा देण्यात येणार आहे. मात्र नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडीमधील रहिवाशांनीही वरळीप्रमाणे एका घरामागे एका वाहनाची जागा देण्याची मागणी केली आहे. नायगावमध्ये दुसऱ्या टप्प्यांत एका घरामागे एका वाहनाची जागा देण्याचे आश्वासित करण्यात आले आहे.

मात्र त्याबाबतचा कोणताही लेखी निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या रहिवाशांमध्ये नाराजी आहे. त्याचवेळी वरळीत एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. मात्र सध्या ज्या ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला आहे. त्यांना अद्याप वाहनतळाची जागा देण्यात आलेली नाही. कारण अद्याप वाहनतळ बांधून पूर्ण झालेले नाही. त्यांची तात्पुरती सोय म्हणून त्यांना एका मोकळ्या जागेत वाहने लावण्यासाठीची सुविधा देण्यात आली आहे. मात्र रहिवाशांमध्ये तेथे वाहने लावण्यावरुन वाद होत आहेत. त्यामुळे कायमस्वरुपी वाहनतळाची सुविधा लवकरात लवकरात करुन द्यावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

पहिल्या टप्प्यांत मुंबई मंडळाकडून वरळीत सात मजली वाहनतळ बांधण्यात येत आहे. सात मजल्यांपैकी तळमजला आणि पहिल्या मजल्यावर व्यावसायिक गाळे आहेत. त्यातील काही गाळे पात्र अनिवासी रहिवाशांना देण्यात येणार आहेत. त्या गाळ्यांचे क्षेत्रफळ १६० चौ. फूट असेल. तर उर्वरित गाळ्यांची नियमानुसार मंडळाकडून विक्री केली जाणार आहे. दुसऱ्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत वाहनतळ असेल. त्यात एकावेळेस २२०० गाड्या उभ्या करता येणार आहेत. वाहनतळाचे काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण करून सध्या ताबा मिळालेल्या ५५६ रहिवाशांना वाहनतळाच्या जागेचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.