इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. मात्र या कामाला वरळीतील मच्छीमारांचा विरोध विरोध कायम आहे. सध्या पावसामुळे काम बंद असले तरी मासेमारी सुरू झाल्यानंतर सागरी किनारा मार्गाला होणारा विरोध चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या नवीन सरकार समोर हा प्रश्न मांडण्याचा मच्छीमारांचा विचार असून या विषयावरून राजकारण होण्याची शक्यता आहे.

 प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्कमध्ये २.०७२ कि.मी.च्या दोन समांतर बोगद्यांचे कामही वेगात सुरू आहे. मच्छीमारांच्या संघटनांच्या मागणीचा तिढा सोडवण्यात मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे या प्रकल्पातील अडथळा अद्याप दूर झालेला नाही. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात होते. सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारीला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका विरूद्ध मच्छीमार संघटना यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर १६० मीटर असावे या मागणीवर मच्छीमार संघटना ठाम आहेत. दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर पुरेसे असल्याचे मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, हे अंतर बोटींच्या आवागमनासाठी जीवघेणे ठरू शकते, असा आक्षेप घेत मच्छीमार संघटनांनी पुन्हा एकदा सागरी प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा मे महिन्यात दिला होता. मात्र  पावसाळय़ात मासेमारी आणि प्रकल्पाचे कामही बंद झाले. मात्र कोळी संघटनांचा विरोध कायम आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५८.६१ टक्के काम झाले आहे. तसेच २०२२-२३ च्या अखेरीस प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

तात्पुरत्या स्कायवॉकचा भाग पडला

ज्या ठिकाणी सागरी किनारा मार्गाचे काम सुरू होते तेथे कामगारांसाठी तात्पुरती स्कायवॉक तयार केला होता. या स्कायवॉकचा भाग समु्द्रात पडला असून तो अद्याप उचलला नसल्याचा आरोप वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था या मच्छीमार संघटनेचे नितेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर बोटी कशा नेणार असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, सध्या प्रकल्पाचे काम बंद असून सप्टेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे. पाच क्रमांकाच्या खांबापासूनचे काम बंद आहे. कोळी समाजाचा विरोध आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची काळजी घेऊन आम्ही काम करू अशी प्रतिक्रिया सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

या प्रकरणाचा तिढा सोडवण्यासाठी मच्छीमार संघटनांना आता अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पामुळे आधीच वरळीतील कोळी समाजामध्ये शिवसेनेविषयी अढी निर्माण झालेली असताना आता बदलत्या राजकीय परिस्थितीत या विषयाचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli fishermen protest continues against sea coast road zws
First published on: 17-08-2022 at 00:34 IST