मुंबई : गेल्या वर्षी वरळी येथे मद्याच्या नशेत आलिशान गाडी चालवून एका दुचाकीला धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून अटकेत असलेला आरोपी मिहीर शहा याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.

मिहीर याने जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठाने प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला. तत्पूर्वी, मिहीर याची अपघातानंतरची कृती लक्षात तो जामिनास पात्र नसल्याचा दावा सरकारी वकील मनकुँवर देखमुख यांनी केला व त्याच्या जामीन याचिकेला विरोध केला. कोणताही सामान्य, विवेकी माणसाने अपघातानंतर गाडी थांबवली असती आणि जखमींना रुग्णालयात नेले असते.. तथापि, मिहीर याने गाडी थांबण्याऐवजी जखमी झालेल्या महिलेला अपघाताच्या ठिकाणापासून दीड किमीपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर पळ काढला, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

याशिवाय, मिहीर हा उच्चभ्रू वर्गातील असून त्याचे वडील राजकीय नेते आहेत. त्यामुळे, खटल्याच्या या टप्प्यावर त्याला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असेही देशमुख यांनी त्याची जामिनासाठीची याचिका फेटाळण्याची मागणी करताना न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी मिहीर याच्या पुरावे नष्ट करण्याच्या शक्यतेवर एकलपीठाने बोट ठेवले होते. तसेच, खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवल्यानंतर त्याला जामीन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे मतही यावेळी व्यक्त केले होते. त्यावर, कोणत्याही हेतुने मिहीरकडून हा अपघात घडलेला नाही. किंबहुना, अपघातानंतर तो घाबरला होता. त्यामुळे, अपघात झाला म्हणून नाही तर पोलिसांपासून वाचवण्यासाठी पळून गेला होता. कदाचित तो मद्याच्या धुंदीत असल्याने त्याने ही कृती केल्याचा युक्तिवाद त्याच्यावतीने वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला होता.