ठाणे येथील कापुरबावडी परिसरात दोन दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास एका युवतीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली़  यात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ही युवती बेशुद्ध अवस्थेत आहे.
घरी जाणाऱ्या मार्गाऐवजी चालकाने दुसऱ्या मार्गाने रिक्षा नेल्यामुळे ती भेदरली आणि बचावासाठी तिने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तीन पथके तयार केली आहेत.
स्वप्नाली नितीन लाड (२४), असे जखमी युवतीचे नाव असून ती कोलशेत परिसरात राहते. वागळे येथील एका खासगी कंपनीमध्ये ती काम करते. १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता स्वप्नाली नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाण्यासाठी निघाली. त्या वेळी कंपनीतील सहकाऱ्यांनी तिला कापुरबावडी नाक्याजवळ त्यांच्या वाहनाने सोडले. या नाक्यावरून घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. दरम्यान, या रिक्षाचालकाने माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती येथून हायलॅण्ड सोसायटी मार्गे रिक्षा वळविण्याऐवजी भिवंडी मार्गे नेली. त्यामुळे ती घाबरली आणि बचावासाठी तिने रिक्षातून उडी मारली.