घरी जाणाऱ्या मार्गाऐवजी चालकाने दुसऱ्या मार्गाने रिक्षा नेल्यामुळे भेदरलेल्या स्वप्नाली नितीन लाड (२४) या तरूणीने बचावासाठी चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडली होती. रिक्षातून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेली स्वप्नाली गेले २० दिवस कोमात होती. शुक्रवारी सकाळी ती शुध्दीवर आल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्राच्या आधारे काही संशयितांची चौकशी सुरू असून त्यामध्ये रिक्षाचालकांचाही समावेश आहे. मात्र स्वप्नाली बेशुद्ध अवस्थेत असल्याने या घटनेचा उलगडा कसा करायचा, अशा पेचात कापूरबावडी पोलीस सापडले होते. स्वप्नाली शुध्दीवर आल्याने आता संशयितांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
गंभीर जखमी झालेल्या स्वप्नालीच्या मदतीसाठी पुढे आलेल्या नागरिकांना दमदाटी करणाऱ्या तिघा तरुणांना कापुरबावडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे तिघेही बाळकूम परिसरातील रहिवाशी आहेत.
कोलशेत परिसरात राहणारी स्वप्नाली वागळे येथील एका खासगी कंपनीमध्ये ती काम करते. १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता स्वप्नाली नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाण्यासाठी निघाली. त्या वेळी कंपनीतील सहकाऱ्यांनी तिला कापुरबावडी नाक्याजवळ त्यांच्या वाहनाने सोडले. या नाक्यावरून घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. दरम्यान, या रिक्षाचालकाने माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती येथून हायलॅण्ड सोसायटी मार्गे रिक्षा वळविण्याऐवजी भिवंडी मार्गे नेली. त्यामुळे ती घाबरली आणि बचावासाठी तिने रिक्षातून उडी मारली.