Lifestyle And Heart / मुंबई : तरुणांनीही नियमित आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैली बाळगणे गरजेचे असूनही बरीचशी तरुण मंडळी अजूनही हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. छातीत दुखणे, दम लागणे किंवा छातीत धडधडणे यासारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे हे हृदयरोगाच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे असतानाही त्याकडे तरुणवर्ग पुरेसे लक्ष देताना दिसत नाही.

हृदयरोग आता केवळ वृद्ध प्रौढांपुरता मर्यादित नसून तरुणांमध्येही उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके, कोरोनरी धमनी रोग आणि हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बैठी जीवनशैली, तणावाची उच्च पातळी, आहाराच्या चुकीच्या सवयी, वाढता स्क्रीन वेळ, धूम्रपान, मद्यपान आणि अपुरी झोप हे घटक कारणीभूत ठरतात. अनेक तरुण छातीत सौम्य वेदना, थकवा किंवा अनियमित हृदयाचे ठोके यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, असे गृहीत धरतात की ताण किंवा अति श्रमामुळे त्यांना हा त्रास सतावत आहे. वैद्यकीय मदत घेण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

जवळपास ५० टक्के तरुण हे त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक नसतात. दुर्दैवाने २७ ते ४५ वयोगटातील १० पैकी ५ रुग्ण निरोगी आणि आहाराच्या बाबतीत तसेच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असतात, परंतु ते हृदयविकाराच्या प्रमुख लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे, धडधडणे, दम लागणे किंवा असामान्य थकवा हे अनेकदा किरकोळ समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर हृदयरोगांचे निदान होऊ शकते, जे वेळीच आढळल्यास त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

याबाबत योग्य शिक्षण, जागरूकता आणि नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत गरजेची आहे. तरुणांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याला गृहीत धरू नये, कारण वेळीच उपचाराने जीवघेणी गुंतागुंत टाळता येते असे शल्यचिकित्सक डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले.

पन्नाशीमध्ये कोलेस्ट्रॅाल, रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी यासारख्या तपासण्या वर्षातून एकदा तरी करणे आवश्यक आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपायांमध्ये संतुलित आहाराचे सेवन, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि पुरेशी झोप घेणे यांचा समावेश आहे.वेळीच निदान केल्याने केवळ गंभीर आरोग्य समस्यांचा धोका घटनांचा धोका कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

निरोगी जीवनशैली बाळगणे गरजेचे असून लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि दीर्घ, निरोगी आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता आणि वेळीच वैद्यकीय मदत घेणे अपेक्षित असल्याचे केईएच्या ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्या हृदय आरोग्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. २७-४५ वयोगटातील १० पैकी ४ रुग्ण छातीत दुखणे किंवा छातीत धडधडणे यासारखी लक्षणे वेळीच ओळखू शकत नाहीत, कारण त्यांना वाटते की हृदयाच्या समस्या फक्त केवळ वृद्धांनाच होऊ शकतात. ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे लहान वयातच हृदयरोगांचे प्रमाण वाढत असल्याचे ह्रदयशल्यविशारद डॉ. स्वरूप स्वराज पाल यांनी सांगितले.

तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत असून वेळीच तरुणांनी याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच बैठे काम आणि वाढता ताणतणाव यामुळे गेल्या दोन दशकात तरुणांमध्ये ह्रदयटविकाराचा त्रास वाढत असल्याचे दिसून येते. यावर सुयोग्य आहार, नियमित व्यायाम तसेच व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक असून आपल्या ह्रदयाचे आरोग्य आपणच राखले पाहिजे असे ह्रदयविकार तज्ज्ञ डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले.