मुंबई : ८० वर्षाच्या वृद्ध पित्याने ३५ वर्षांच्या मुलाची पोटात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना दादर येथे घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी ८० वर्षीय आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे आरोपीनेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती.

छत्रपती संभाजी नगर येथील लासूर रेल्वे स्थानकासमोर युवराज काळे (८०) कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा अन्वर काळे हा वारंवार मुंबईला पळून यायचा. गेल्या आठवड्यातही तो मुंबईला पळून आला होता. त्याचा शोध घेण्यासाठी युवराज मुंबईत आले होते. दोघांची रविवारी भेट झाली. त्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास पोर्तुगीज चर्च जवळील सॅल्वेशन शाळेजवळील पदपथावर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि युवराजने साेबत आणलेला चाकू अन्वरच्या पोटात डाव्या बाजूला खुपसला. यामुळे अन्वर पदपथावर कोसळल्यानंतर युवराज तेथून निघून गेला. हा प्रकार कळताच दादर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अन्वरला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. रुग्णालयात अन्वरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – मुंबई : नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली

दादर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला. त्यावेळी अन्वरच्या पोटात चाकू मारणारा आरोपी कबुतर खाना परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन युवराजला अटक केली.

हेही वाचा – मुंबई : रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाला सुरुवात, आयआयटीची गुणवत्ता तपासणीही सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दारूच्या वादातून हत्या

अन्वरला माघारी नेण्यासाठी युवराज मुंबईत आला होता. दोघे रविवारी सकाळी भेटल्यानंतर ते सिद्धीविनायक मंदिर परिसरात गेले. तेथून दोघेही एका दारूच्या दुकानात गेले. दारू प्यायल्यानंतर ते पोतुर्गीज चर्च येथे गेले. तेथे पदपथावरच युवराज झोपला. हीच संधी साधत अन्वरने वडिलाच्या पिशवीतील पैसे चोरून पुन्हा दारूचे दुकान गाठले. दरम्यान, युवराजला जाग आल्यानंतर अन्वर व पिशवीत पैसे नसल्याचे त्याला आढळले. त्यामुळे युवराज पुन्हा दारूच्या दुकानाच्या दिशेने गेला. वाटेतच त्याला अन्वर भेटला. मग दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. त्यातूनच युवराजने अन्वरच्या पोटात चाकू खुपसला. अन्वर केवळ जखमी झाला असेल असा समज करून युवराज तेथून गेला. परंतु बराच वेळ तेथेच पडून राहिल्याने अन्वरच्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.