मुंबईः लग्न मोडल्यामुळे संतप्त झालेल्या २२ वर्षीय तरूणीवर हल्ला केल्याचा प्रकार धारावी परिसरात घडला. कपड्यांच्या दुकानात शिरून आरोपीने २२ वर्षीय तरूणीवर ब्लेडने हल्ला केला. जखमी तरूणीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरावीा येथील मुस्लिम नगरमध्ये वास्तव्यास असलेली सफरुन बानो अब्दुल रेहमान शेख (२२) अशोक मिल कपाऊंड येथील कपड्यांच्या दुकानात कामाला आहे. आरोपी अब्दुल मलिक शेख (२६) याने कपड्यांच्या दुकानात शिरून सफरूनवर सोमवारी ब्लेडने हल्ला केला. आरोपीने तरूणीचा गळा पकडून तुला ठार मारून टाकतो, असे म्हणाला. त्यानंतर तरूणीच्या गळ्यावर ब्लेड मारले. त्यात धक्का देऊन तरूणी पळू लागली असता आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर ब्लेडने हल्ला केला.
यावेळी तरूणीच्या गालावर वार झाला. तेथून कशीबशी स्वतःची सुटका करून तरूणी पळाली. मात्र आरोपी तिचा पाठलाग करीत होता. तरूणीने दुकानातून बाहेर पडून आरडाओरडा केला. त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला. जखमी तरूणीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. पीडित तरूणीच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी अब्दुल शेख विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.