मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून सळई पडल्याने खाली उभ्या असेल्या ३० वर्षीय ट्रकचालकाच्या मदतनीसाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी मरोळ येथे ही दुर्घटना घडली. अमर पगारे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरोळ येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी नाशिक येथून सिमेंटचे ब्लॉक्स मागविण्यात आले होते. ट्रकचालक अनिल कचरू कोकणे आणि त्याचा मदतनीस अमर आनंद पगारे ऊर्फ बाळा (३०) सामान घेऊन आले. सकाळी ११ वाजता ट्रकचालक कोकणे ट्रकमध्ये झोपला होता.

मदतनीस (क्लिनर) अमर पगारे सामान उतरवले जात असताना ट्रकमधून खाली उतरला. त्याच वेळी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एक लोखंडी सळई अमरच्या डोक्यात पडली. त्याला तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी असलेल्या मजुरांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बांधकामस्थळावरील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. बांधकामस्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. आम्ही पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी (पूर्व) येथील शिवकुंज बांधकामस्थळावरून सिमेंट ब्लॉक पडून आरबीएल बँकेत काम करणाऱ्या २२ वर्षीय संस्कृती अमीन हिचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा नोंदविला होता.