मुंबई : दुकानाबाहेर लावलेल्या क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक पैसे देत असतात. ग्राहक अगदी ५-१० रुपयांपासून पैसे देतात. त्यामुळे व्यवहार सोपा झाला आहे. परंतु याच क्यूआर कोडची अदलाबदली करून फसवणूक करण्याची शक्कल एका तरुणाने लढवली होती. खार पोलिसांनी याप्रकरणी सदर तरुणाला अटक केली.
खार रेल्वे स्थानक परिसरातील भाजी गल्लीत अनेक लहान – मोठे भाजीविक्रेते व्यवसाय करतात. विक्रेत्यांनी दुकानाबाहेर क्यूआर कोडचे स्टिकर चिकटवले आहेत. भाजी विकत घेणारे ग्राहकांनी त्यावर स्कॅन करून पैसे देतात. हे पैसे थेट बॅंक खात्यात पैसे जमा होतात. गेल्या काही वर्षांपासून अशा पद्धतीने व्यवहार करण्यात येत आहे. दिनेश गुप्ता (५६) यांचा या ठिकाणी भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले होते. ग्राहक भाजी खरेदी केल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून पैसे द्यायचे. पण ते पैसे खात्यात येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. जवळपास एक महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. गुप्ता यांनी आसपासच्या विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्यांनी देखील पैसे येत नसल्याचे सांगितले. काही तांत्रिक अडचण असावी असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी त्या क्यूआर कोडला स्कॅन केल्यावर गुप्ताऐवजी दुबे नाव आले. तेव्हा मात्र आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सर्व विक्रेत्यांनी १६ जुलै रोजी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अशी केली अटक
खार पोलिसांनी भाजी गल्लीतील आणि आसपासच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. क्यूआर कोडला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकाचा ठावठिकाणा (लोकेशन) काढला. त्यावेळी संबंधित मोबाइलधारक गोरेगाव परिसरात असल्याचे समजले. सायबर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धापटे, पोलीस कर्मचारी नारायणकर यांनी पुढील तांत्रिक तपास करून अधिक माहिती काढली. संशियत गोरेगाव (पूर्व) येथील चिंतामणी अव्हेन्यू इमारतीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. शिव ओम चंद्रभान दुबे (२२) असे या आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील कन्नोज येथील रहिवासी असून सध्या कुलाबा येथील मच्छीमार नगरात वास्तव्यास आहे. विक्रेते रात्रीच्या वेळी दुकान बंद करून जातात. मात्र क्यूआर कोडचे स्टीकर त्यांचे दुकान आणि टपऱ्यांच्या बाहेरच असते. ते पाहून आरोपी शिव दुबेने शक्कल लढवली. त्याने त्या क्यूआर कोडवर आपल्या बॅंक खात्याशी संलग्न असलेले क्यूआर कोड चिकटवले. भाजी घेतल्यावर ग्राहकांनी क्यूआर कोड स्कॅन करून अदा केलेले पैसे संबंधित भाजी विक्रेत्याऐजी दुबेच्या खात्यात जात होत होते.
अनेक ठिकाणी क्यूआर कोडची अदलाबदली
शिव दुबे याने मुंबईतील अनेक ठिकाणी अशा प्रकारे क्यूआर कोडची अदलाबदल केल्याची कबुली पोलिसांनी केलेल्या चौकशीत दिली. त्याच्याकडे तीन बॅंक खाती आहेत. हे क्यूआर कोड याच तीन बॅंक खात्यांशी संलग्न होते, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.