लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक आज (२० मार्च रोजी) फोर्ट संकुलातील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात होत आहे. या बैठकीतच मुंबई विद्यापीठाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अधिसभेची निवडणूक अद्याप होऊ न शकल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच ही अर्थसंकल्पीय बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील युवा सेनेच्या माजी अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
नियमित प्र-कुलगुरूंची तसेच परीक्षा नियंत्रकांची नेमणुक कधी होणार?, किरीट सोमय्यांच्या पीएचडी सत्यता बाहेर येईल का?, एटीएला बाहेरचा रस्ता दाखवणार का?, अस्थायी कर्मचाऱ्यांना किमान समान वेतन मिळणार का?, विद्यापीठाचा जलतरण तलाव विद्यार्थ्यांना वापरता येणार का?, नवीन ग्रंथालय इमारत विद्यार्थ्यांना कधी उपलब्ध होणार?, क्रीडा संचालकांचा मनमानी कारभार थांबणार का?, एमएमआरडीए कलिना संकुलाचा विकास करणार का? आदी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे आणि त्यांच्या विविध मागण्यांचे तसेच प्रलंबित प्रश्नांचे फलक युवा सेनेच्या सदस्यांनी हातात घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.