आरोपीविरुद्ध ‘पॉस्को’अंतर्गत गुन्हा दाखल

नागपूर : वडिलांसोबत उपचारासाठी नागपुरात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण नागपूर रेल्वेस्थानकावरून करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फूटजेवरून अपहरणकर्त्यांला इटारसी येथून अटक केली.

मध्यप्रदेशातील एकाने आपल्या १३ वर्षीय मुलीला उपचारासाठी नागपुरात आणले होते. रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते परत जाण्यासाठी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आले. अमरावती-जबलपूर पॅसेंजरने गावाकडे  जाणार होते. ही गाडी रात्री नऊची आहे. गाडीला वेळ असल्याने वडील आणि अपहृत मुलगी दोघेही फलाट क्रमांक एकवर विश्रांती घेत होते.  मुलीच्या वडिलांचा डोळा लागला हे बघून आरोपी मनोजकुमार  महतो (३७, रा. खगरिया, बिहार) मुलीजवळ आला. त्याने तिचा हात पडकला आणि तेथून निघाला. फलाटावर उभ्या गाडीत तिला घेऊन चढला. तो तिला झाशीला घेऊन जाणार होता, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मुलगी न दिसल्याने  वडील घाबरले. त्यांनी  रेल्वेस्थानकावर तिचा शोध घेतला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे गाठले.  उपनिरीक्षक होतीलाल मीणा आणि उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी लगेच सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसले. त्या गाडीत कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांना  सूचना दिली. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीचे छायाचित्र पाठवले. या गाडीतील जवानांनी सर्वसाधारण बोगीची झडती घेतली असता अपहरणकर्ता सापडला. इटारसी रेल्वेस्थानकाजवळ त्याला पकडले.

त्याला आज मंगळवारी दुपारच्या सुमारास नागपुरात आणण्यात आले. चौकशीनंतर आरोपी विरुद्ध अपहरण आणि बाललैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात कामासाठी आला होता.