कंत्राटदार कंपन्यांचे संचालक, १५ अधिकाऱ्यांवर कारवाई

नागपूर/अमरावती : सिंचन प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत बनावट नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे, निविदेच्या रकमेत नियमबाह्य़ वाढ करणे, अपात्र कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेणे यासह इतरही प्रकरणांत नागपूर अमरावती विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी कंत्राटदार कंपन्यांच्या संचालकांच्या विरोधात एकाच दिवशी १४ गुन्हे  दाखल केले. कागदपत्रांची पडताळणी न करता कंत्राटदाराचे हित जोपासण्यासाठी पदाचा दुरुपयोग करणाऱ्या नागपूरच्या १२ व अमरावतीच्या १५ अशा एकूण २७ अधिकाऱ्यांच्या विरोधातही एसीबीने कारवाई केली आहे.

आगामी  अधिवेशनाच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने  त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील दगडपारवा, पूर्णा बॅरेज, उमा बॅरेज, बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, हिरडव आणि अमरावती जिल्ह्यातील भगाडी प्रकल्पांशी संबंधित कंत्राटदार आणि सिंचन विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात एसीबीने चौकशीनंतर गुन्हे दाखल केले आहेत. तर नागपूर विभागात मोखाबर्डी आसोलामेंढा कालवा, नेरला उपसिंचन योजना, गोसेखुर्द मुख्य डावा कालवा, घोडाझरी कालवा आणि गोसीखुर्द उजवा कालवा अशा सात प्रकरणात एसीबीने तक्रार दाखल केली आहे.