News Flash

काकावरील रागातून पुतण्याचे अपहरण करून खून

सूरजने क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने राजला बोलावून त्याचे गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता अपहरण केले.

नागपूर : काकावर असलेला राग व त्याचा बदला घेण्यासाठी एकाने १५ वर्षीय पुतण्याचे अपहरण करून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी रात्री घडली. या घटनेने उपराजधानीत खळबळ उडाली असून आरोपीने मुलाचे अपहरण केल्यानंतर कुटुंबीयांना भ्रमणध्वनी करून त्याच्या काकाचे शिर सादर करण्याची खंडणी मागितली होती.

राज ऊर्फ मंगलू चंदन पांडे (१५), रा. इंदिरा मातानगर, रायसोनी कॉलेजमागे असे मृत मुलाचे तर सूरज रामभाऊ शाहू (२०), रा. सीआरपीएफ गेटजवळ असे आरोपीचे नाव आहे. राजचे वडील एका खासगी कंपनी ऑपरेटर म्हणून काम करतात. त्याला मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे.  त्यांच्या शेजारी

त्याचे काका मनोज पांडे आणि वस्तीतच आरोपीही राहतो. आरोपी हा राजच्या कुटुंबीयांना ओळखतो. सूरजने क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने राजला बोलावून त्याचे गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता अपहरण केले. त्यानंतर तो त्याला घेऊन हुडकेश्वर खुर्द परिसरात गेला. त्या ठिकाणी राजला मारहाण केली व भ्रमणध्वनीवरून राजच्या आईला संपर्क साधला. यावेळी त्याने राजचे अपहरण केल्याचे सांगून त्याच्या काकाचे शिर कापून दाखवल्यास त्यांच्या मुलाची सुटका करेल, अशी अजब अट टाकली.

या अटीने पांडे कुटुंबीयांना धक्का बसला. पांडे कुटुंबीय त्याची गयावया करू लागले. पण, तो राजला सोडायला तयार नव्हता. राज हा रडत असल्याने त्याच्या कुटुंबीयांचे हृदय हेलावले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास सुरू केला. सूरजचा हा वारंवार भ्रमणध्वनीवरून मनोज पांडेचे शीर कापण्यासाठीच सांगत होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्याने राजच्या उजव्या हाताचे मनगट सर्जिकल ब्लेडने कापले होते व डोक्यावर दगडाने वार करून खून केला होता. तो घटनास्थळावरून पळून गेला होता.

आईवर अत्याचाराचा दावा

मनोज पांडेने आपल्या आईवर अत्याचार केल्याचा दावा सूरज करीत आहे. पण, पोलिसांनी त्याच्या आईची चौकशी केली असता तिने नकार दिला. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सूरजचा अपघात झाला होता. या अपघातासाठी मनोज जबाबदार असल्याचे त्याला वाटत होते.

‘आपके साथ कोई दुश्मनी नही’

सूरजने अनेकदा राजच्या कुटुंबीयांना संपर्क साधून ‘मेरी आपके साथ या आपके लडके के साथ कोई दुश्मनी नही है’ असे सांगत होता. पण, मनोज पांडेचे मुंडके छाटल्यानंतरच त्याला सोडेल, असेही बोलायचा. राज हा मनोजचा मुलगा नाही, असे असतानाही आरोपीने त्याचा खून केला.

पोलीस ठाण्याजवळच लावली दुचाकी

आरोपी सूरजने खून केल्यानंतर आपल्या दुचाकीने तो शहरात परतला. त्यानंतर त्याने सोनेगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच दुचाकी उभी केली व तो परिसरात फिरत होता. दरम्यान, पोलिसांना त्याची चाहूल लागली व त्याला पकडण्यासाठी पोलीस समोर जात असताना तो दुचाकी घेऊन पळून गेला. शेवटी वर्धा मार्गावरून जाताना दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:28 am

Web Title: 15 year old boy murder after kidnapped in nagpur zws 70
Next Stories
1 विदर्भात टपाल खात्याच्या ठेवीदारांमध्ये घसघशीत वाढ
2 मेडिकलमध्ये तोतया डॉक्टरला पकडले!
3 ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकाराचे धडे! 
Just Now!
X