दगावलेल्या रुग्णाच्या संपर्कातील एकाचा समावेश; मेयोतून करोनामुक्त होऊन तिघे घरी परतले

नागपूर : उपराजधानीत करोनाग्रस्त वाढत असून शनिवारी सतरंजीपुरात दगावलेल्या रुग्णाच्या संपर्कातील एका नातेवाईकासह चंद्रपूरच्या इंडोनेशीयाहून नागपुरात परतलेल्या दुसऱ्या एका महिलेलाही या विषाणूची लागण झाल्याचे मेडिकलच्या प्रयोगशाळेतील अहवालावरून पुढे आले आहे. दरम्यान, मेयोतून  करोनामुक्त होऊन खामल्यातील एकाच कुटुंबातील तिघे जण घरी परतले आहेत.

नवीन रुग्णामध्ये दगावलेल्या करोनाग्रस्त वृद्धाच्या ५३ वर्षीय नातेवाईकाचा समावेश आहे. मृत वृद्ध आजारी असतांना  ही व्यक्ती  त्याला भेटायला  गेली होती. या व्यक्तीमुळे सतरंजीपुरातील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता सातवर पोहचली आहे.  इंडोनेशीयाहून पतीसह नागपुरात परतलेल्या चंद्रपूरच्या एका ३२ वर्षीय महिलेलाही हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या पतीलाही करोना झाला आहे.   नवीन दोन रुग्णांमुळे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. यापैकी यशस्वी उपचारामुळे आजपर्यंत ८ जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

खिामल्यातील  व दिल्लीहून परतलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघांना आज शनिवारी  रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यात व्यावसायिकाची ३५ वर्षीय पत्नी, ६० वर्षीय आई आणि १६ वर्षीय मुलाचा समावेश आहे. व्यावसायिकालाही शुक्रवारी करोनामुक्त झाल्यावर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. आता या पाचही व्यक्तींना घरातही विलगिकरणात रहावे लागणार आहे.

टाळ्या वाजवून निरोप

मेयो रुग्णालयात यशस्वी उपचारानंतर करोनामुक्त झालेल्या तिघांना  सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. याप्रसंगी तिघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी हात जोडून येथील सगळ्यांचे आभार मानले.

‘एम्स’मध्येही नमुने तपासणीची प्रतीक्षा वाढली

अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स) प्रशासनाने तातडीने प्रयोगशाळा उभारून तेथे  तपासणीही सुरू केली आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने या प्रयोगशाळेवर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्य़ांतील नमुने तपासणीचा भार टाकला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री अचानक अमरावती या एकाच जिल्ह्य़ातील येथे शंभर नमुने व इतर जिल्ह्य़ातूनही मोठय़ा संख्येने नमुने पोहचले.  येथे रोज ७० ते ८० च्या दरम्यान नमुने तपासले जात असल्याने तपासणीची प्रतीक्षा वाढत आहे.