नागपूर शहरात पतंग उडवताना काळजी न घेतल्याने प्रत्येक वर्षी २० हून जास्त मृत्यू होत असल्याची माहिती आहे. हे मृत्यू पतंग पकडताना गच्चीवरून पडणे, वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू होणे, मांजा गळ्यात अडकून अपघात होणे यासह विविध प्रकारे होतात. गेल्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी दोघांचा पतंगबाजी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. योग्य काळजी घेतल्यास हे मृत्यू व शेकडो जखमी होण्याच्या घटना टाळणे शक्य आहे.

गेल्यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सद्भावना नगरातील देवांशू विजय अहेर या नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू त्याच्या आजोबाच्या मिरे लेआऊट येथील घराच्या छतावर पतंग उडवतांना उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने झाला होता.  दुसऱ्या एका घटनेत खामला येथील झोपडपट्टीतील राजेश पुरण पटेल या १८ वर्षीय तरुणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला होता. या दोन घटनांनी नागपूरकरांमध्ये धडकी भरली होती. त्याच प्रमाणे पतंगचा मांजा वाहनचालकाच्या गळ्यात अडकूनही अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. मांज्यामुळे गळा चिरल्याने काहींचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला होता. पतंग पकडतांना घराया छतावरून गच्चीवरून पडूनही काहींचा मृत्यू गेल्यावर्षी संक्रांतीच्या दरम्यान नोंदवल्या गेला होता.

प्रत्येक वर्षी शहरात वीसहून जास्त मृत्यू बेजबाबदारपणे पतंग उडवून होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे.

त्याकरिता पतंग पकडतांना रस्त्याने धावणे योग्य नाही. पतंग उडवत असलेल्या मुलावर प्रत्येक पालकाने नजर ठेवण्याची गरज आहे. पतंग उडवताना जवळ कोणतीही वीज तार असायला नको. रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाच्या अंगावर पतंग तुटल्यावर त्याचा मांजा जाणार नाही, अशा पद्धतीने मोकळ्या मैदानातच पतंग उडवण्याकरिता प्राधान्य देण्याची गरज आहे.

लक्षात ठेवा..

  • वीज तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
  • तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
  • वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नका.
  • रस्त्याच्या कडेला उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा.