नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग) महामार्गाच्या विदर्भातील टप्प्याचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.

महामार्गाची सुरुवात नागपूर जिल्ह्यतील शिवमडका या गावापासून होत असून नागपूरसह वर्धा, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्य़ातून हा महामार्ग जाणार आहे. जून, २०२१ पर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मोपलवार यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गावर उड्डाण पूल, व्हायाडक्ट, मोठे आणि छोटे पूल, पादचारी, छोटी वाहने आणि पाळीव प्राण्यांसाठी भुयारी मार्ग आदी एकूण १११ संरचनांचा समावेश आहे. आतापर्यंत ६३ कामे पूर्ण  झाली तर ३५ कामे प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मोपलवार यांनी केला.

समृद्धी महामार्गालगत २० ठिकाणी नवीन नगरे वसवली जाणार आहेत. त्यात नागपूरसह विदर्भातील दहा नवनगरांचा समावेश आहे. त्याच्या उभारणीसाठी रस्ते विकास महामंडळाने आठ टप्प्यांचा कार्यक्रम तयार केला असून यापैकी पाच टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.  प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या २३ हजार लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाच लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याच्या पुनरुच्चार मोपलवार यांनी केला. प्रस्तावित मुंबई नागपूर बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गा जवळून धावणार नाही असे ही मोपलवार यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.

टाळेबंदीचा परिणाम

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा समृद्धी महामार्गाच्या कामावर अंशत: परिणाम झाला. मात्र, आता स्थलांतरित परप्रांतीय कामगारही मोठय़ा संख्येने पुन्हा कामावर परतू लागल्याने कामाला गती मिळाली आहे, असे मोपलवार यांनी सांगितले. सद्यस्थितीत समृद्धी महामार्ग प्रकल्पावर १४ हजार कामगार काम करीत आहेत.