08 August 2020

News Flash

विदर्भात ‘सारी’चे ५० बळी!

सारीच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते.

संग्रहित छायाचित्र

महेश बोकडे

करोनाने विदर्भात बाराशे रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला असून ५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने करोनावर लक्ष केंद्रित केले असतानाच सारी (सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) चेही १,२७७ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मेडिकल, मेयोसह सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत सारीचे ५० बळी गेले असून यापैकी बहुतांश रुग्ण विदर्भातील असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा अंदाज आहे.

या विषाणूमुळे अकोल्यात सर्वाधिक २७ मृत्यू झाले असून अमरावती १५, नागपूर ९, वाशीम २, बुलढाणा ३, वर्धेत १ मृत्यू झाला आहे. विदर्भात सर्वाधिक ५६५ रुग्ण हे केवळ नागपूर जिल्ह्य़ातील असून अकोल्यात ७६ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.  सारीग्रस्त वाढल्याने बहुतांश रुग्णालयांत  स्वतंत्र वार्डची सोय केली असून त्यांची करोना चाचणीही होत आहे. सारीच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे या रुग्णांना करोनाची बाधा होण्याची जोखीम अधिक असते. त्यातच सारी आणि करोना या दोन्ही आजारांच्या रुग्णांची लक्षणे जवळपास सारखीच असतात. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे येथील संचालक- २ अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. परंतु अकोला आणि नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने एवढे रुग्ण आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयांत सारीचे ३७ हून अधिक रुग्ण दगावल्याचे मान्य केले. दरम्यान मेडिकल, मेयोत मध्य प्रदेश, छत्तीसगडसह इतर ठिकाणचेही अत्यवस्थ रुग्ण मोठय़ा संख्येने उपचाराला येतात.

विदर्भातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सारीच्या  एकूण १,२७७ रुग्णांपैकी दहा जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोला विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये सारीच्या ३०६ रुग्णांपैकी चौघांना तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमधील ९६५ रुग्णांपैकी १२ जणांना करोना असल्याचे  स्पष्ट झाले आहे.

‘सारी’ची विदर्भातील स्थिती

जिल्हा            रुग्ण

नागपूर                ५७९

भंडारा                 १४१

चंद्रपूर                 ०८०

गडचिरोली           ०४५

गोंदिया                ०२७

वर्धा                    ०९९

अकोला               ०७६

अमरावती             ०४६

बुलढाणा              ०९१

वाशीम                 ०११

यवतमाळ             ०८२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 12:19 am

Web Title: 50 victims of sari in vidarbha abn 97
Next Stories
1 पोलीस कर्मचाऱ्यांच्या करोना चाचणीवर शिक्कामोर्तब
2 आयुक्तांच्या मनमानीविरुद्ध पार्वतीनगरात जनआंदोलन
3 टाळेबंदीत शिथिलता मिळताच शहरातील प्रदूषण वाढले
Just Now!
X