२४ तासांत ६ मृत्यू; ६४४ नवीन रुग्ण; पालकमंत्र्यांकडून टाळेबंदीचा इशारा

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६ करोनाबाधितांचा मृत्यू तर ६४४ नवीन रुग्णांची भर पडली. या धोकादायक काळातही नागरिकांनी  नियम न पाळल्यास जिल्ह्य़ात टाळेबंदी लागू करण्यात येईल, असा इशारा  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.

विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्य़ात आढळत आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील जास्त्ीात जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. करोनाचे सर्वाधिक रुग्ण ३० ते ४० वयोगटातील असून रुग्ण वाढण्याला मुखपट्टी न घालणे, शारीरिक अंतर न ठेवण्यासह बिनधास्त फिरणेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. करोना नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी २४ तासांत शहरात ५७४, ग्रामीण ६७, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ६४४ रुग्ण आढळले.  दिवसभरात शहरात २, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेर ३ असे एकूण ६ मृत्यू झाले. दिवसभरात शहरात १९६, ग्रामीण ५४ असे एकूण २५० व्यक्ती करोनामुक्त झाले.

पालकमंत्र्यांनी घरच्या लनसोहळ्यातून दिला विधायक संदेश

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल याचा विवाह दिनेश भावसागर यांची मुलगी आकांक्षा हिच्यासोबत १९ फेब्रुवारीला आहे. मंत्र्यांच्या मुलाचे लग्न म्हटले तर देशाच्या विविध भागातून मान्यवर येतात. परंतु करोनाचा प्रादुर्भाव बघता पालकमंत्र्यांनी काँग्रेस प्रणीत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह इतरही  ज्येष्ठ नेत्यांना शहरातील करोना स्थितीची माहिती दिली. सोबतच नागपुरातील नातेवाईकांसह अनेक परिचितांना लग्नसोहोळ्यात ऑनलाईनच सहभागी होण्याचा सल्ला दिला. लग्नसमारंभात एकाच वेळी ५० हून अधिक लोकांनी सभागृहात हजर राहू नये म्हणून ते स्वत: काळजी घेत समाजाला विधायक संदेश देत आहेत.

लक्ष्मीनगरातील पिझ्झा हट बंद

शहरातील विविध भागातील दुकानात करोना बाधित वाढत असताना गुरुवारी लक्ष्मीनगरातील पिझ्झा हटमधील कुक व एक कर्मचारी  करोनाबाधित आढळल्यामुळे पिझ्झा हट बंद करण्यात आले आहे.

सक्रिय बाधितांची संख्या पाच हजारांवर

गुरुवारी शहराात सक्रिय  बाधितांची संख्या ४,३०१, ग्रामीण ८०४ अशी एकूण ५,१०५ रुग्णांवर पोहोचली आहे.  गंभीर संवर्गातील ९६८ रुग्ण विविध रुग्णालयांत, ३,४९३ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

चार मंगल कार्यालयांवर कारवाई

महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने गुरुवारी शहरातील ४ मंगल कार्यालयांवर कारवाई करत ३५ हजार रुपये दंड वसूल केला. तर ८८ मंगल कार्यालयांची तपासणी केली. आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात झोन शोध पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली. नेहरूनगर झोन अंतर्गत म्हाळगीनगर चौकातील बेसा पॉवर हाऊसजवळील एम्पोरियम हॉल, लकडगंज झोन अंतर्गत वर्धमाननगर येथील सातवचन लॉन, आशीनगर झोन अंतर्गत पॉवरग्रीड चौकातील जगत सेलिब्रेशन लॉन व मंगळवारी झोनमधील गोधनी मार्गावरील गोविंद लॉनवर कारवाई करण्यात आली. या मंगल कार्यालयांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी आढळले. यापैकी एम्पोरियम हॉल व जगत सेलिब्रेशन लॉनकडून प्रत्येकी १५ हजार रुपये दंड तात्काळ वसूल करण्यात आला. तर वर्धमाननगर येथील सातवचन लॉन कार्यालय बंद असल्याने त्यांना १५ हजार रुपये दंडाचा नोटीस बजावण्यात आली. गोधनी मार्गावरील गोविंद लॉनकडून ५ हजार रुपये दंडासह दिवसभरातील कारवाईत ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील १०, धरमपेठ १४, हनुमाननगर ९, धंतोली  ११, नेहरूनगर ९, गांधीबाग ५, सतरंजीपुरा ४, लकडगंज ८, आशीनगर  ८, मंगळवारी झोनमधील १० असे एकूण ८८ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. दरम्यान,सिव्हिल लाईन भागातील एका लॉनवर विवाह समारंभात वऱ्हाडय़ांची गर्दी झाली होती. लॉनच्या बाहेर वरात येताच बँडच्या तालावर लोक नाचत असताना उपद्रवी शोध पथकाने वरातीवर कारवाई केली आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला.