हजारोंच्या संख्येने कामगार संविधान चौकात एकवटले

नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या  देशव्यापी संपात हजारोच्या संख्येने कामगारांनी सहभाग घेतला. नागपुरात भारतीय मजदूर संघावर आगपाखड  करत, येथेच कामगारांच्या प्रश्नांवर लढा देणाऱ्या संघटनांचे विभाजन करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यश आल्याची तोफही डागली.

संविधान चौकात हजारोच्या संख्येत विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी, सर्वच संघटनांच्या नेत्यांनी भाषणांत सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत, मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. असंघटित क्षेत्रातील कामगार संघटनांनीही आपला आक्रोश व्यक्त करत, सरकारविरोधी सूर आळवला  संविधान चौकात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली मोठय़ा संख्येने अंगणवाडी सेविका, पोषण आहार तयार करणारे कर्मचारी, आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र स्ट्रेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, संयुक्त खदान मजदूर संघ,  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन, आयसीडीएस सुपरवाईझर संघटना, नागपूर जिल्हा शेतमजूर युनियन, मनरेगा कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी अध्यक्ष म्हणून मोहनदास नायडू, प्रमुख पाहुणे म्हणून ताजुद्दीन, माधव भोंडे,  मारोती वानखेडे, मोहन शर्मा, श्याम काळे, धरमठोक, बीएनजी शर्मा, मधुकर भरणे,चंदा मेंढे, अरुण वनकर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन सी.एम. मौर्य यांनी केले.