नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) एकूण रुग्णांपैकी ८३.९६ टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत.  आजपर्यंत झालेल्या एकूण मृत्यूतील ९२ टक्के रुग्णांचे मृत्यूही नागपूर जिल्ह्यातच नोंदवले गेले आहेत. त्यामुळे करोनानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्णही  नागपूर जिल्ह्याच अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाच्या नोंदीतून पुढे आले आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्यांत आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे १ हजार ४४१ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक १ हजार २१० (८३.९६ टक्के) रुग्न नागपूर जिल्ह्यातील आहेत.  भंडाऱ्यात १३ (०.९० टक्के), चंद्रपूरला ८६ (५.९६ टक्के), गोंदियात ४१ (२.८४ टक्के), वर्धा जिल्ह्यात ९१ (६.३१ टक्के रुग्ण आढळले आहे.  गडचिरोलीत मात्र एकही रुग्णाची नोंद नाही.  पूर्व विदर्भात आजपर्यंत या आजाराचे १२० मृत्यू नोंदवण्यात आले. त्यातील सर्वाधिक १११ मृत्यू (९२.५ टक्के) नागपूर जिल्ह्यातील, २ मृत्यू (१.६६ टक्के) चंद्रपूर जिल्ह्यातील, ४ मृत्यू (३.३३ टक्के) गोंदिया जिल्ह्यातील तर ३ मृत्यू (२.५ टक्के) वर्धा जिल्ह्यातील आहेत.  आजपर्यंत गडचिरोली, भंडारा या दोन जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नोंदीनुसार, ४ जून २०२१ रोजी नागपुरात या आजाराचे ५२३, भंडारा १३, चंद्रपूर ५१, गोंदिया ३१, वर्धा ६७ सक्रिय रुग्ण विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

१,०१५ रुग्णांवर शस्त्रक्रिया

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ४ जून २०२१ पर्यंत म्युकरमायकोसिसच्या १ हजार १५ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  सर्वाधिक ८९९ रुग्णांवर शस्त्रक्रिया नागपूर जिल्ह्यात, ४  शस्त्रक्रिया भंडाऱ्यात, ४४ शस्त्रक्रिया चंद्रपूरला, १८ शस्त्रक्रिया गोंदियात, तर ५० रुग्णांवर वर्धा जिल्ह्यात  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उपचारानंतर  ६३४ रुग्णांना विविध रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली.

त्यात नागपुरातील ५७६, भंडाऱ्यातील ३, चंद्रपुरातील ३३, गोंदियातील ५, वर्धा जिल्ह्यातील २४ रुग्णांचा समावेश असल्याचेही आरोग्य विभागाच्या नोंदीतून पुढे आले आहे.