News Flash

घरबसल्या शिकाऊ वाहन परवान्यासाठी ‘आधार’सक्ती

घरबसल्या  शिकाऊ वाहन परवान्यासाठी नागरिकांना आधार क्रमांक संगणकीय प्रणालीत नोंदवणे सक्तीचे राहणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

ऑनलाईन चाचणीत ६० टक्के अचूक उत्तरेही आवश्यक

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : घरबसल्या  शिकाऊ वाहन परवान्यासाठी नागरिकांना आधार क्रमांक संगणकीय प्रणालीत नोंदवणे सक्तीचे राहणार आहे. सोबतच  घरून द्यायच्या ऑनलाईन चाचणीमध्ये ६० टक्केहून अधिक अचूक उत्तरेही द्यावी लागणार आहेत. या नवीन संकल्पनेमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे.  याबाबतचे पत्र परिवहन आयुक्त कार्यालयाचे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना ८ जूनला पाठवले आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील आरटीओ कार्यालयातील दलाल संस्कृतीवर नियंत्रणासाठी नागरिकांना घरबसल्या वाहन चालवण्याचा परवाना देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्लीकडून अधिसूचनाही निघाली. त्यावरून राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना केंद्र यांच्या माध्यमातून वाहन व सारथी ४.० या संगणकीय प्रणालींमध्ये नुकतेच बदल केले. त्यामुळे शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करताना नागरिकांना त्यात आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यामुळे अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल. परिणामी, परिवहन कार्यालयांना अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करावी लागणार नाही.

प्रक्रियेचा पुढचा भाग म्हणून अर्जदाराला रस्ता सुरक्षाविषयक  चलचित्र बघून लगेच शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन चाचणी द्यावी लागेल. त्यात ६० टक्केहून अधिक अचूक उत्तरे दिल्यास घरबसल्या परवान्याची प्रिंट मिळेल. वयाची चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तीला शिकाऊ परवान्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र लागते. नवीन पद्धतीत हे प्रमाणपत्रही डिजिटल परिवहन संगणकीय प्रणालीत लागेल. त्यामुळे डॉक्टरांनी परिवहन कार्यालयाकडे रितसर अर्ज केल्यास या प्रणालीसाठी यूझर आयडी व पासवर्ड मिळेल. त्यामुळे डॉक्टरांना या संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र देता येईल. आधार क्रमांक नसलेल्या व्यक्तीला पूर्वीप्रमाणे आरटीओ कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीनुसार परवाना घेता येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.

वाहन निरीक्षकांमार्फत तपासणीची गरज नाही

नवीन आदेशानुसार, आता नवीन वाहने नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत तपासणीची गरज राहणार नाही. वाहन  विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक आपोआप जारी होणार आहे. वाहन वितरक सर्व कागदपत्रे डिजीटल स्वाक्षरी करून नोंदणीकरिता अपलोड करतील. त्यामुळे या वाहनांची कागदपत्रे परिवहन कार्यालयात सादर करण्याची गरज राहणार नाही.

‘‘परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त यांनी पुढाकार घेत नागरिकांचा वेळ व खर्च वाचवण्यासाठी घरबसल्या  परवाना देण्यासाठी संगणकीय प्रणालीत बदल केले आहेत. सुमारे सात दिवसांत या पद्धतीने काम सुरू होण्याची आशा आहे.’’

– विनोद जाधव, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:53 am

Web Title: aadhaar card mandatory for getting driving learning licence at home zws 70
Next Stories
1 पावसाळ्याच्या तोंडावर चेंबरची झाकणे बेपत्ता
2 तिसऱ्या लाटेचा सामना करताना गाफील राहू नका – गडकरी
3 शासनाच्या अर्थसहाय्याकडे ऑटोरिक्षा चालकांची पाठ!
Just Now!
X