मुख्य टपाल कार्यालयात नागरिकांना वाईट अनुभव
सरकार प्रत्येक कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करू पाहत असताना आधार कार्ड बनवण्यासाठी, त्यात दुरुस्ती करण्यासाठी मात्र सरकारकडे पुरेशी सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे लोकांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे. आधार कार्डमध्ये नावात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन सुविधा बंद करण्यात आली आहे. त्याचाही फटका लोकांना बसत आहे. मुख्य टपाल कार्यालयात आधार केंद्र आहे. येथे नवीन आधार कार्ड बनवण्याचे कमी आणि नावात बदल करण्याचे, पत्ता बदलण्याचे, इंग्रजी नावातील दुरुस्ती अशी प्रकरणे मोठय़ा संख्येने येत आहेत, परंतु सहा-सहा महिने काम होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
आधार कार्ड टपालाने घरी आल्यानंतर इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा जन्म तारीखमध्ये झालेली चूक लक्षात येते. दुरुस्तीसाठी लोकांना आधार कार्ड केंद्राचा शोध घेत फिरावे लागत आहे. मुख्य टपाल कार्यालयात अशी सुविधा आहे. येथे काम कसे चालते हे ‘लोकसत्ता’ने जाणून घेतले असता जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेसारखाच इथेही लोकांचा त्रास कायमच असल्याचा अनुभव आला. या केंद्रावर नाव बदलण्यासाठी आलेले देवनगर येथील जागेश्वर लांडगे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून पत्नीच्या आधार कार्डमध्ये दुरुस्तीसाठी खेटे घालत आहे. महापालिकेतील आधार केंद्रावर सहा महिन्यांपूर्वी नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता. पत्नीच्या नावासमोर जागेश्वर ऐवजी प्रकाश करण्यात आले आहे. माझ्या आधार कार्डवरील नाव बरोबर आहे, परंतु पत्नी आणि मुलांच्या नावासमोर माझे नाव चुकीचे छापण्यात आले. ही चूक दुरुस्तीसाठी अर्ज केला, परंतु पत्नीच्या आधार कार्डवर दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पुन्हा महापालिकेतील केंद्रात गेलो. काही दिवसांनी बदल होईल, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे तीनदा तेथे जाऊन आलो, पण दुरुस्तीसह कार्ड मिळाले नाही. आता महापालिकेतील केंद्र बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जी.पी.ओ. मध्ये आलो आहे. पत्नीच्या पॅन कार्डवर नाव बरोबर आहे. त्याच्याच आधारावर आधार कार्ड करायला दिले होते. मात्र, चुकीचे नाव छापण्यात आले. नेट कॅफेमध्ये आधी अशी दुरुस्ती करून दिली जात होती, पण आता तेथे दुरुस्ती केली जात नाही. सरकारने ते बंद केले आहे, सरकार नियमात वारंवार बदल करून विनाकारण लोकांना त्रास देत आहे, असा आरोपही जागेश्वर लांडगे यांनी केला.
आधारचे काम असल्याने टपाल कार्यालय उदासीन
टपाल कार्यालयात आधारचे काम करणारा कर्मचारी हा मूळात टपाल कार्यालयाचा माणूस असतो. दिवसभर होणारी लोकांची गर्दी त्याला नकोशी वाटते. तो नाखुशीनेच हे काम करीत असतो. एखाद्या अशिक्षित, अल्पशिक्षित व्यक्तीने अर्जातले काही न समजल्यावर या कर्मचाऱ्याकडे विचारणा केली तर तो चिडतो, संतापतो. आधारचे काम होत नसल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या लोकांना कर्मचाऱ्यांच्या या संतप्त वागणुकीचाही वेगळा फटका बसतो.