मंगेश राऊत

‘वन नेशन, वन चालान’ यंत्रणेअंतर्गत कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी आता केंद्रीय परिवहन विभागाने ‘वन नेशन, वन चालान’ या यंत्रणेअंतर्गत तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उपराजधानीमध्ये जानेवारी-२०१९ पासून करण्यात येणार आहे.

चौका-चौकात उभे राहून पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र तरीही काही जण नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.  ‘वन नेशन, वन चालान’ योजनेंतर्गत नोंदणीकृत वाहन मालकाच्या मोबाईल क्रमांकावर एमएमएसद्वारे चालान पाठवण्यात येते. ते न भरल्यास प्रादेशिक परिवहन विभाग वाहन मालकाचा वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करेल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे

व चालानचा दंड न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल व वाहन जप्त करण्यात येणार आहे. या नवीन सुविधेची अंमलबजावणी जानेवारी २०१९ पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दंड ऑनलाईन भरा

चालानचा एसएमएस आल्यावर दंडाची रक्कम बँकेत किंवा वाहतूक विभागात भरावी लागते. मात्र, जानेवारीपासून एसएमएससोबत दंड ऑनलाईन भरण्यासाठी एक लिंक दिली जाईल. त्या माध्यमातून वाहन चालकांना नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे दंडाची रक्कम भरणे शक्य होईल. तसेच वाहतूक पोलिसांकडे  ‘पीओएस’ मशीन देण्यात येणार आहे. या मशीनमधून आता लोकांना ताबडतोब चालान पावती व दंड भरल्याची पावती दोन्ही मिळेल. सध्या ही सुविधा केवळ मुंबईत सुरू आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न लावणे, दुचाकीवर तिघेजण जाणे,  मद्य प्राशन करून वाहन चालवणे, विनापरवाना गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे या सहा वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात कारवाई होईल. दंड न भरणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित केला जाईल. तसेच एकापेक्षा अधिक चालान प्रलंबित असल्यास व वाहन चालवण्याचा परवाना निलंबित केला असल्यास तसे वाहन वाहतूक पोलीस जप्त करतील. शिवाय संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा पर्यायही खुला असेल.

– राजतिलक रोशन, वाहतूक पोलीस उपायुक्त.