शहरात पेट्रोल पोहोचले ८५.४३ वर

नागपूर : सलग सहा दिवसांपासून इंधन दरवाढ केली जात असून पेट्रोलच्या दरवाढीने पंच्याअंशी ओलांडली आहे. सततच्या पेट्रोल दरवाढीने जनता संतापली आहे.

शहरात आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५.४३ रुपये ते ८५.५१ रुपये होते. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर झाला असून ते रोष व्यक्त करू लागले आहेत. ऑटोरिक्षा चालकांनी तर अघोषित दरवाढही करून टाकली आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पेट्रोलचे वाढलेले दर बघून अनेकांनी पेट्रोल पंपावरच नाराजीचा सूर आवळला होता, परंतु यात पेट्रोलपंप चालकांचा दोष नाही. पेट्रोल कंपन्यांनी दर वाढवले असे सांगून ग्राहकांना शांत केले जात असल्याचे शहरातील पेट्रोल पंपावर चित्र होते. यासंदर्भात गृहिणी आणि खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांची प्रतिक्रिया बोलकी होती. नोकरी-व्यवसायनिमित्ताने, मुलांना उन्हाळी शिबिराला, शिकवणी सोडण्यासाठी रोज बाहेर पडावे लागते. अशाप्रकारे सातत्याने इंधनाच्या किंमती वाढतील तर आमचे दैनंदिन काम चालणार कसे. सरकारने पेट्रोल दरवाढीवर लगाम लावावे, असे खासगी बँकेतील कर्मचारी माधुरी तेलरांधे म्हणाल्या.

जेव्हापासून हे सरकार आले, तेव्हापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांत मीटरने भाडे घेण्याचे दर तेच आहेत, परंतु इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे ऑटोरिक्षा चालकांना धंदा करणे कठीण होऊ बसले आहे. सरकारने तातडीने दरवाढी थांबवली नाही तर ऑटोरिक्षाचालक आंदोलन करतील, असा इशारा ऑटो चालक-मालक महासंघाचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार यांनी दिला. दरम्यान, याच मुद्यांवरून युवक काँग्रेसने आज संविधान चौकात निदर्शने केले तर उद्या, गुरुवारी काँग्रेस इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार आहे.

आधीचे दिनच अच्छे होते

दरदिवशी पेट्रोलची दरवाढ केली जात आहे. त्यामुळे महिन्याचे बजेट बिघडले आहे. घराबाहेर पडताना दहावेळा विचार करावे लागते. आधी १०० रुपयांचे पेट्रोल टाकले की, एका आठवडा निघत होता. आता दरवर्षी १०० रुपयांचा पेट्रोल भरावा लागतो आहे. सरकार राजकारणात मश्गूल आहे. त्यांना सामान्य जनतेकडे लक्ष वेळ नाही. आधीचे दिवस चांगले होते, अशी प्रतिक्रिया दक्षिण-पश्चिम नागपुरातील ममता डवरे यांनी व्यक्त केली.

दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये पेट्रोलाचाही समावेश झालेला आहे. भाजीसाठी मार्केटमध्ये जाणे असो वा उन्हाशी शिबिरांना मुलांना ने-आण करणे असो पेट्रोलतर रोजच लागणारी वस्तू आहे. मात्र, सारख्या होत असलेल्या दरवाढीमुळे घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे. त्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे गाडी आणि पेट्रोल दोन्हींचे होणारे नुकसान आपल्याला सहन करावे लागतेय. दररोज होणारी दरवाढ संताप वाढवणारी आहे.

      – माधुरी तेलरांधे

बुधवारचे इंधनाचे दर

’  पेट्रोल- ८५.५१ रुपये

’  डिझेल- ७३.३२ रुपये

’  पॉवर- ८८.३५ रुपये

’  टुरबो- ७६.६१ रुपये