उच्च न्यायालयाचे आदेश

वध्र्याच्या अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाबा शंभरकर यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्यावर पदच्युत होण्याची वेळ आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत त्यांना पायउतार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

महाविद्यालयातील निरंजन भास्कर ब्राम्हणे यांच्यासह नऊ प्राध्यापकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शंभरकर यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि १०९ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे.

तक्रारकर्त्यांच्या मते प्रभारी प्राचार्यावर व्यवस्थापनाने, विद्यापीठाने कोणतीही कार्यवाही केली नाही. महाविद्यालय व्यवस्थापनाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार महाविद्यालयात सेवाज्येष्ठता यादी सुधारित करण्यात येणार येईल. विद्यमान प्राचार्य सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्यपद आले नव्हते.

महाराष्ट्र शासनाच्या १४ सप्टेंबर २०१५च्या पत्रानुसार फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई संस्था आणि विद्यापीठाने करायला हवी. मात्र, अनेक प्रकरणात दोषी आढळलेल्या प्राचार्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात न्यायालयाने येत्या ३१ मार्चपर्यंत संस्थेला सेवाज्येष्ठता यादी तयार करून ज्येष्ठतेनुसार प्राचार्य नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच महिलांना साडी सक्तीची करण्यापासून ते शिक्षकांचा मानसिक छळ करण्याचा आरोप असलेल्या बाबा शंभरकर यांना प्रभारी प्राचार्यपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.