News Flash

राज्यात सडक्या सुपारीची तस्करी

म्यानमार, श्रीलंकामार्गे इंडोनेशियातून आयात

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

म्यानमार, श्रीलंकामार्गे इंडोनेशियातून आयात

तुम्ही सुपारीचे शौकीन आहात? भरपेट भोजनानंतर, झुरकेदार धूम्रपानानंतर मुखशुद्धी म्हणून सुगंधी सुपारीची दोन-चार खांडे तोंडात टाकण्याची सवय आहे तुम्हाला? किंवा पानवाल्याने ‘कौनसा सुपारी?’ म्हणून विचारताच रुबाबात ‘कच्चा-पक्का’ म्हणून सांगता तुम्ही? मग तुम्हाला हे माहीत असायलाच हवे..

की, विदेशातून सडलेली सुपारी चोरवाटेने आयात करून ती विकण्याचा गोरखधंदा मोठय़ा प्रमाणावर सुरू असून, नागपूर हे त्याचे एक केंद्र आहे. एवढेच नव्हे तर ही निकृष्ट सुपारी सल्फर डायऑक्साइडचा वापर करून भाजून टणक केली जाते. अलीकडेच केंद्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) या तस्करीविरोधात कारवाई सुरू केली असून, त्यातून सुपारी न लागताच घाम फुटेल अशी ही तथ्ये समोर येत आहेत. सुपारीच्या या तस्करांमध्ये गोंदिया, नागपूर आणि मुंबईतील काही व्यापाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

देशात सुपारीचे उत्पादन कर्नाटक, केरळ, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मिझोरम, तामिळनाडू, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात काही प्रमाणात होते. मात्र, देशांतर्गत उत्पादित सुपारीचे दर अधिक आहेत. जगात सर्वाधिक सुपारीचे उत्पादन इंडोनेशिया येथे होते. तेथून सुपारीची आयात केली जाते. नियमानुसार आयात सुपारीवर मूळ किमतीच्या १०३ टक्के सीमाशुल्क भरावे लागते. त्यामुळे ती देशातील सुपारीपेक्षा महाग ठरते. त्यामुळेच भारतात आणि पाकिस्तानातही तिची तस्करी केली जाते.

भारतात चोरटय़ा मार्गाने येणारी ही सुपारी नागपुरात मोठय़ा प्रमाणावर विकली जाते. ती निकृष्ट दर्जाची व बहुतांश वेळी सडलेली असते. यातील जी काही थोडय़ा प्रमाणात बरी असते ती फोडून विकली जाते आणि निकृष्ट सुपारी ‘सल्फर डायऑक्साइड मिश्रणात भाजून अधिक टणक केली जाते. नागपुरातून राज्यातील अन्य जिल्ह्य़ांप्रमाणेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड आदी राज्यांमध्ये ती पाठवली जाते व यातून कोटय़वधी रुपये कमावले जातात. यात नागपुरातील छोटे-मोठे सातेशवर व्यापारी गुंतले आहेत. यात मोठय़ा प्रमाणात सीमा शुल्कासह इतरही करांची चोरी केली जाते. त्यामुळे शासनाचाही महसूल बुडतो.

या प्रकरणाचे बिंग फुटल्यावर प्रथम अन्न व औषध प्रशासन विभागाने व नंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय), केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने नागपूर व विदर्भातील सुपारी व्यापाऱ्यांवर कारवाई करून हजारो टन सुपारीचा साठा जप्त केला. त्यात डीआरआयच्या कारवाईतील तीनशे टन सुपारीचा समावेश असून एकूण तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर १० वर प्रकरणांचा तपास सुरू आहे. तस्करीद्वारा नागपुरात दररोज शंभर ट्रक सुपारी आणण्यात येत असल्याची माहिती डीआरआय सूत्राने दिली.

सीमेवर विशेष व्यवस्था 

म्यानमार सीमेवरून भारताच्या सीमेपर्यंत सुपारी पोहोचवण्याची जबाबदारी म्यानमारमधील तस्कर अब्दुल हबीब याच्याकडे आहे. त्यानंतर मिझोरम मार्गे ती भारतात दाखल झाल्यावर नागपूपर्यंत पोहोचवण्यासाठी मच्छुवानी भाई हे काम करतो. श्रीलंकेतून मुंबई बंदरात येणारी सुपारी सोडवून ती नागपूरकरिता रवाना करण्याचे काम नुरानी याच्याकडे आहे. इंडोनेशियातून भारतात येणारी बहुतांश सुपारी सिंगापूर येथील अप्लाईड लॉजिस्टीक कंपनी, सू. चू. कंपनी (पीटीई) आणि एम.एम. ट्रेडिंग कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून येते, हे विशेष. ही सर्व माहिती डीआरआयच्या चौकशीदरम्यान समोर आली असून डीआरआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर ही माहिती सादर केली.

निकृष्ट व धोकादायक

एप्रिलपासून आतापर्यंत अनेक सुपारी व्यापाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यात ५ कोटी २० लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली असून त्या सुपारीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी काही निकृष्ट व धोकादायक असल्याचे प्रयोगशाळेत स्पष्ट झाले.     – शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

तस्करीचे मार्ग

इंडोनेशियातून निघालेल्या सुपारीची सिंगापूर-थायलँड, म्यानमार, मणिपूर-सिलचर-गुवाहाटी आणि नागपूर या मार्गाने तस्करी करण्यात येते. त्याशिवाय सिंगापूर-म्यानमार -श्रीलंका-मुंबई-नागपूर या मार्गाचाही वापर करण्यात येतो. सुपारी तस्करीसाठी समुद्रमार्ग व भारतात रस्ते मार्गाचा वापर करण्यात येतो. श्रीलंकेत उत्पादित वस्तूंवर भारतात सीमा शुल्क लागत नाही. नागपुरातील तस्कर इंडोनेशियाची सुपारी म्यानमारवरून समुद्रमार्गे श्रीलंकेत नेतात आणि तेथे सुपारी अनेक दिवस साठवून नंतर ती श्रीलंकेतील असल्याचे दाखवून भारतात आणली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 12:38 am

Web Title: areca nut smuggling in maharashtra
Next Stories
1 मोर्चाचे नेतृत्व पवारांकडे आल्याने काँग्रेस नेते बुचकळ्यात
2 सूत्रधार दुर्गेशची रायपूरमध्ये आत्महत्या
3 गुन्हेदरात नागपूर देशात दुसरे
Just Now!
X