पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्यावतीने नागपूरच्या मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या फूड पार्कच्या भूमिपूजनासाठी या कंपनीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण ९ तारखेला नागपुरात येणार आहेत.

बाबा रामदेव यांच्या कंपनीला नागपुरात जागा उपलब्ध करून देण्यापासून तर ती सवलतीच्या दरात देण्यापर्यंत राज्य शासनाने झुकते माप दिले आहे. मिहानमध्ये २३० एकर जागा कंपनीला देण्यात आली आहे. त्यापैकी २०० एकर जागेवर फूड पार्क उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन १० ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रामदेवबाबा व स्मामी बाळकृष्ण एक दिवस आधी म्हणजे ९ ऑगस्टलाच नागपुरात दाखल होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्याचा रामदेवभाबा भक्तांचा प्रयत्न असून त्यासाठी पतंजली योग समितीचे कार्यकर्ते विविध ठिकाणी सभा घेत आहेत.

शंकरनगर येथील साई सभागृहात नुकतीच पतंजलीच्या कार्यकर्त्यांची एक सभा पार पडली. त्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडय़ातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, बाबांचे साधक आणि इतरही क्षेत्रातील नागरिकांना भूमिपूजनासाठी बोलवण्याबाबत सभेत नियोजन करण्यात आले. जबाबदारीचे वाटप करून देण्यात आले. बैठकीत हरिद्वार येथील मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, प्रांतीय संरक्षक राव यशपाल आर्य, प्रांतीय प्रभारी कर्नल किरणसिंह पाटील, विष्णू भुतडा, किसान सेवा समितीचे राध्येशाम धूत, सह महिला प्रांत प्रभारी भारती शेंडे, सहप्रभारी सचिन आर्य, मनोज खंडाळ उपस्थित होते.