विमानतळाच्या आवारात हरणाचे पाडस; नव्याने उपाययोजना आखणार
डीजीसीए आणि बीसीएसीच्या चमूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करून दहा दिवसही होत नाहीत, तोच विमानतळाच्या आवारात हरणाचे पाडस आढळून आले. यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा दावा आणि चमूच्या शेऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी आंतराष्ट्रीय मानकाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था नाही. विमानतळ परिसरातील जंगलात रानडुक्कर, ससे आणि हरीण आहेत. हे प्राणी धावपट्टीच्या जवळ अनेकदा आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या १४ ऑक्टोबर २०१५ च्या नागपूर दौऱ्यातदेखील रानडुक्कर धावपट्टीजवळ आले होते. यापूर्वीदेखील ससे विमानाला धडकले होते. हरीणदेखील अनेकदा परिसरात आढळून आले आहेत. या प्राण्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही हे खरे आहे. परंतु आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय विमानतळ परिसराच्या सुरक्षा भिंतीविषयी अनेक तक्रारी आहेत. सोनेगावकडील सुरक्षा भिंत आणि अतिक्रमणधारकांची भिंत सारख्याच उंचीवर आहे. या भागातून भिंतीवर सहज चढणे शक्य आहे, असे दिसून आले आहे.
नागपूर विमानतळाच्या सुरक्षाविषयी प्रसिद्धी माध्यमांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्याने अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालक (डीजीसीए), पश्चिम विभाग आणि ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिशन सिक्युरिटी (बीसीएसी) चमूने नागपूर विमानतळ आणि विमानतळाची सुरक्षा भिंतीची पाहणी केली. ही चमू २१ ते २३ डिसेंबर २०१५ असे सलग तीन दिवस नागपुरात होती.
या चमूने पाहणी अहवाल डीजीसीएच्या मुख्यालयाकडे अहवाल सादर केला. या चमूचा पाहणी दौरा संपून १० दिवसही झाले नसताना २ जानेवारी २०१६ विमानतळ परिसरात हरणाचे पिल्लू (पाळस) आढळून आले. यामुळे मिहान इंडिया लि. आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केलेला सुरक्षा व्यवस्थेचा दावा फोल ठरला आहे.
डीजीसीए आणि बीसीएसीच्या चमूने नागपूर विमानतळ, परिसर आणि सुरक्षा भिंतीचे निरीक्षण केले. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक सुरक्षा भिंत आणि सुरक्षा कर्मचारी व्यवस्था योग्य असल्याचे एमएडीसीने म्हटले आहे. विमानतळाची सुरक्षा भिंत व्यवस्थित असून सीआयएसएफचे जवानांचा चोवीस तास पहारा असतो. डीजीसीए व बीसीएसीच्या चमूने विमानतळ आणि परिसराची पाहणी केली. चमूने विमातळावरील आणि परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले, असा दावा एमएडीसीने केला आहे.
सीआयएसएफचे जवान विमानतळ परिसराचे दररोज निरीक्षण करतात. विमानतळाचे वरिष्ठ अधिकारीदेखील नियमित निरीक्षण करतात. सुरक्षा व्यवस्थेविषयी काही त्रुटी आढळल्यास तातडीने दुरुस्ती केली जाते, असे एमएडीसीचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी म्हणाले.
यापुढे विमानतळावरील धावपट्टीच्या सुरक्षेला महत्त्व देण्यात येईल, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. विमानतळ परिसर हा संवेदनशील परिसर मानला जातो. त्यामुळे येथील परिसराची नव्याने पाहणी करण्यात येईल. तसेच सुरक्षा विषयक उपाययोजनांची माहिती घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर हे सुमारे ४५० एकरच्या परिसरात आहे.
* डीजीसीए व बीसीएसीच्या चमूचे २१ ते २३ डिसेंबरला पाहणी दौरा केला.
* चमूने सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केल्याचा एमएडीसीचा दावा फोल ठरला.
* विमातनळ परिसरात २ जानेवारीला हरणाचे पिल्लू आढळले.