महेश बोकडे

खासगी प्रयोगशाळांना मुंबईच्या काही भागात घरोघरी जाऊन नमुने घेण्याची मुभा आहे. विदर्भात ती नाही. दुसरीकडे विदर्भातून हे नमुने मुंबई- दिल्लीला तपासणीला पाठवायचे झाल्यास विमानसेवा बंद आहे. शिवाय रस्ते वाहतुकीसाठीच्या विविध परवानग्या इतरही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे नागपूरचे निवडक नमुने वगळता विदर्भातून नमुने घेणे बंद आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा हे सध्या करोनामुक्त जिल्हे आहेत. परंतु इतर सात जिल्ह्य़ांत कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपुरात असून त्यानंतर बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती जिल्ह्य़ांचा क्रमांक लागतो. राज्यात एकीकडे रुग्णांची वाढती संख्या तर दुसरीकडे प्रयोगशाळा कमी असल्याने नमुने तपासण्यावर मर्यादा बघता शासनाने अनेक खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी दिली. यापैकी पाच प्रयोगशाळांचे केंद्र नागपूरसह विदर्भात आहे. परंतु मेट्रोपॉलिस या एकाच प्रयोगशाळेने सध्या तपासणीचे धाडस दाखवले. इतरांनी नमुने मुंबई-दिल्लीत पाठवण्याची अडचण असल्याने ही तपासणी सुरू केलेली नाही.

दरम्यान, मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेलाही हे नमुने मुंबईलाच पाठवावे लागतात. सध्या टाळेबंदीमुळे विमानसेवा बंद असल्याने रस्त्ये वाहतुकीतून ते पाठवले जात आहेत. या प्रयोगशाळेकडून आयसीएमआर संस्थेच्या पत्रासह मुंबईतील काही भागात घरातून रुग्णांचे नमुने घेण्याची मुभा असल्याचे सांगत विदर्भातही घरातून नमुने घेण्याची परवानगी  स्थानिक प्रशासनाला मागण्यात आली आहे. त्यात हल्ली आपत्कालीन स्थितीत ते लाभ घेणार नसून सवलतीचे दर देण्यासह सुमारे ५ हजार दरिद्रय़रेषेखालील नागरिकांच्या तपासण्या नि:शुल्क करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाच्या अडचणींमुळे त्यांना परवानगी नाही. दुसरीकडे सध्या खासगी रुग्णालयांत सर्दी, खोकल्याचे रुग्ण तपासले जात नसल्याने येथूनही नमुने घेण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे आतापर्यंत या प्रयोगशाळेने केवळ ३० ते ४० नमुनेच खासगी रुग्णालयांतून गोळा करून तपासणीला पाठवल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक प्रशासनाने खासगी चाचणी करणाऱ्यांसाठी अटी शिथिल केल्यास येथील रुग्ण खासगी प्रयोगशाळेतही हे नमुने तपासू शकणार आहेत. निश्चितच त्याने मेडिकल, मेयो या करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या जोखमीच्या ठिकाणी त्यांना जावे लागणार नाही.

तर नागपूरच्या प्रयोगशाळेवरील ताण कमी

नागपूरच्या मेडिकल, मेयो, एम्ससह अकोल्यातील एक अशा एकूण चार प्रयोगशाळेत सध्या करोनाचे नमुने तपासणीचे काम सुरू आहे. पशु व मत्स विद्यापीठाच्या नागपुरातील आणखी एका प्रयोगशाळेला मंजुरी असली तरी अद्याप संच मिळाले नसल्याने तेथील तपासणी बंद आहे. नागपूरच्या तिन्ही प्रयोगशाळेत सध्या केवळ २५० ते २७० नमुने तपासता येतात. खासगी प्रयोगशाळेला मुभा मिळाल्यास या प्रयोगशाळेवरील ताण कमी होऊन तातडीने  अहवाल कळून शासकीय प्रयोगशाळेवरील ताण कमी होईल.

मेट्रोपॉलिस प्रयोगशाळेकडून सामाजिक बांधीलकी म्हणून काही कंपन्यांच्या मदतीने बीपीएल संवर्गातील रुग्णांची मोफत तर इतरांची अत्यल्प दरात तपासणीची तयारी शासनाला दर्शवली आहे. मुंबईत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घरातूनही नमुने घेऊन तपासणी सुरू आहे. विदर्भासह सर्वत्र स्थानिक प्रशासनाला विविध परवानग्या मागितल्या असून तेथेही सेवा देण्याची तयारी आहे.

– अवधूत जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष, मेट्रोपॉलिस, मुंबई.