News Flash

महिलांच्या ‘भरोसा कक्ष’चा उपक्रम नागपूरप्रमाणेच राज्यभर

नितीन गडकरी म्हणाले की, कायद्याविषयी सन्मान आणि भीती असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजातील हिंसेचे स्वरूप बदलत आहे. यासाठी समाजात कायद्याचे भय असणे आवश्यक. ‘भरोसा’ कक्षामुळे कोणत्याही प्रकराच्या हिंसाचारास बळ पडलेल्या महिला व मुलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ प्राप्त होईल. नागपूरच्या धर्तीवर राज्यात इतर ठिकाणीही भरोसा सेलची निर्मिती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सुभाषनगर टी पॉईंटजवळील ‘भरोसा’ कक्षाचे उद्घाटन नववर्षांच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कौटुंबिक हिसाचारांच्या घटनांमध्ये महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने हा सेल सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आणि पोलीस आयुक्त आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम उपस्थित होते.

पोलीस ठाण्यात तक्रार करताना येथे आपल्याला न्याय मिळेल, असे नागरिकांना वाटायला हवे. गुन्हा घडल्यावर कारवाई करण्यासोबतच गुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी प्रयत्नशील असावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत विविध योजना राबविण्यात आल्या. सीसीटीएनएस, डीजीटल ठाणी, सीसीटीव्ही यासारख्या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, कायद्याविषयी सन्मान आणि भीती असणे आवश्यक आहे. कायद्यातील सीमा ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच कोणत्याही समस्यांवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडून आणण्यावर भर द्यावा. कक्षाच्या उद्घाटनाच्या वेळी एक तक्रारही नोंदवण्यात आली.

असा आहे ‘भरोसा कक्ष’

हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘भरोसा कक्ष’ सुरू करण्याचा प्रथम प्रयोग नागपूर येथे करण्यात आला. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्याय कुठे मागावा, हेच समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसार रस्त्यावर येतो. हा प्रकार टाळण्यासाठी या सेलमध्ये दोन्ही बाजूंचे समुपदेशन केले जाते. यानंतरही काहीच झाले नाही, तर नंतर पुढील पोलीस कारवाई केली जाते. या सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. २४ तास हा कक्ष सुरू असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2017 2:10 am

Web Title: bharosa cell for women will open in different part of maharashtra say chief minister devendra fadnavis
Next Stories
1 नागपूरच नव्हे, तर राज्याच्या इतर भागाचेही चित्र पालटणार -मुख्यमंत्री
2 बीएनएचएस व अ‍ॅक्सेंचर लॅबच्या वतीने ‘इंटरनेट ऑफ बर्ड्स’ तंत्रज्ञान विकसित
3 रस्त्यांच्या कामांमध्ये नियमांचे उल्लंघन
Just Now!
X