टाळेबंदीमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठीच्या श्रमिक विशेष रेल्वेत एका महिलेने बाळाला जन्म दिला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढुर्णा रेल्वे स्थानकावर घडली.

अमृतसर येथून चांपाकडे निघालेल्या विशेष रेल्वेतील एका महिलेला प्रसूती कळा आल्या. यासंदर्भातील सूचना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. रेल्वेच्या डॉक्टरांना कळवण्यात आले. पांढुर्णा रेल्वे स्थानकजवळ असल्याने ही गाडी तेथेच थांबवण्यात आली.

महिलेला स्थानकावर उतरवण्यात आले आणि काही वेळात एका गोंडस बाळाचा जन्म झाला. माता आणि बाळ दोघे स्वस्थ असल्याने त्याच गाडीने पुढील प्रवासाची परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी वाणिज्य नियंत्रण कक्षाला सूचना दिल्यावर नागपूर स्थानकावर डॉक्टर तयार ठेवण्यात आले होते.