भाजप कार्यकर्त्यांचा आरोपींमध्ये समावेश

सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा सहा प्रकरणात गुन्हे दाखल केले असून आरोपींमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक भाजप कार्यकर्ते व बांधकाम व्यवसायी यांचा समावेश आहे.

गोसीखुर्द उजव्या कालव्यावरील बी-१ शाखेच्या शून्य ते ८ मीटरमधील मातीकाम व बांधकामाच्या निविदेचे नियमबापणे मूल्य वाढवणे, निविदेचे अवैधपणे अद्ययावतीकरण करणे, कंत्राटदार जे. व्ही. फर्मची भागदारी निबंधक कार्यालयाकडे नोंदणी नसताना त्यांना कंत्राट देणे, बनावट प्रतिस्पर्धी निविदा भरणे आणि कंत्राटदार कंपनीऐवजी वैयक्तिक कामाचे आदेश देण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात सेवानिवृत्त विभागीय लेखाधिकारी गुरुदास सहदेव मांडवकर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, माजी कार्यकारी संचालक देवेंद्र  परशुराम शिर्के, मेसर्स खळतकर कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि कंपनीचे संचालक मेसर्स जयंत माधवराव खळतकर यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भादंविच्या ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आंध्रप्रदेशच्या तेलगू देशम पार्टीचे आमदार रामाराव रेड्डी यांची कंपनी श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीने खळतकर याला आममुखत्यारपत्र दिले होते. खळतकर हा भाजपच्या दक्षिण नागपूर कार्यकारिणीचा पदाधिकारी असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कट्टर समर्थक आहे.

त्याशिवाय अंभोरा उपसा सिंचन योजनेच्या किन्ही मांढळ येथील वितरिकेवरील जलसेतू व लादीमोरीचे  मातीकाम व बांधकाम, गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा ९१ ते ९९ किमी दरम्यानचे खोदकाम,  मातीकाम, अस्तरीकरण व बांधकाम, घोडाझरी शाखा कालवाच्या २६ ते ३७ किमी दरम्यान मातीकाम व बांधकाम, मोखाबर्डी उपसा सिंचन योजना मुख्य कालवा २७ किमीपर्यंत व नवशी ब्रँच व चार वितरिकेचे मातीकाम व बांधकाम आणि गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी शाखा कालव्याच्या ४५ ते ५० किमी दरम्यान मातीकाम व बांधकामात निविदा प्रक्रियेची नियमाबाह्य़पणे किंमत  वाढवून गैरव्यवहार करण्याच्या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व प्रकरणांतील आरोपी जवळपास सारखेच आहेत.

आरोपींची नावे

गुरुदास मांडवकर, संजय खोलापूर, सोपान सूर्यवंशी, देवेंद्र शिर्के, जयंत खळतकर यांच्याशिवाय इतर प्रकरणांमध्ये माजी कार्यकारी अभियंता मुकेश वाय. राणे, चंदन तुळशीराम जिभकाटे, दिलीप पोहेकर, तत्कालीन कार्यकारी अभियंता ललित इंगळे आणि माजी कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. वरीलपैकी अनेक आरोपी एकापेक्षा अधिक गुन्ह्य़ात सहभागी आहेत.

दोन प्रकरणांत आरोपपत्र

नागपूर एसीबी कार्यालयातर्फे सिंचन घोटाळ्यात एकूण ४० प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यापैकी एकूण १४ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर उर्वरित १२ प्रकरणांचा तपास सुरू आहे. या प्रकरणांचा तपास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.