आंदोलनाचा इशारा

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या सुरू असलेल्या अतिक्रमित मंदिरे तोडण्याच्या कारवाईला सोमवारी भाजपसह काँग्रेस व काही सामाजिक संघटनांनी विरोध केला. त्रिमूर्ती नगरातील एका धार्मिक स्थळ पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला तर पूर्व नागपुरातील कारवाई विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. काही सामाजिक संघटनाही या आंदोलनात उतरल्या आहेत. दरम्यान भाजपची सत्ता असताना मंदिरे पाडली जात असल्याने काँग्रेसने टीका केली आहे.

महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने शहरातील विविध भागातील अतिक्रमित धार्मिक स्थळे तोडण्यात येत आहे. आता त्या विरोधात जनाक्रोश वाढू लागला असून त्याचे प्रत्यंतर सोमवारी त्रिमूर्तीनगरात आले. तेथील धार्मिक स्थळावर कारवाई करण्यासाठी पथक आले असता महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विरोध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.त्यामुळे पथक परत गेले.

दरम्यान, संदीप जोशी आणि प्रवीण दटके म्हणाले, उच्च न्यालयाच्या आदेशाप्रमाणे रस्त्यावर असलेले धार्मिक स्थळ पाडण्यास आमचा विरोध नाही. रस्त्याच्यामध्ये किंवा विकास कामांना जी धार्मिक स्थळ बांधित करतात ती पाडली गेली पाहिजे मात्र, विविध वस्त्यांमध्ये वाहतुकीस अडथळे नसलेली धार्मिक स्थळे तोडली जाते. त्याला आमचा विरोध आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, असे  जोशी यांनी सांगितले. २००८ च्या झोपडपट्टय़ा नियमित करू शकता, तर धार्मिक स्थळ का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विरोधात आता न्यायालयात जाण्याची तयारी करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

३ ऑगस्टला विशेष सभा

धार्मिक स्थळे पाडण्याच्या कारवाई विरोधात भाजपचे सर्व नगरसेवक उद्या, मंगळवारी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. त्यानंतर ३ ऑगस्टला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत सर्व सदस्य आपली मते मांडून प्रशासनाला जाब विचारतील. त्यानंतर प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला पाठवला जाणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.

काँग्रेसही रस्त्यावर

पूर्व नागपुरातील धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाई विरोधात काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. त्यांनी लकडगंज झोनचे सहायक आयुक्त जयदेव यांना निवेदन दिले. आंबेडकर चौकातून मिरवणूक निघून महापालिकेच्या लकडगंज कार्यालयात पोहोचल्यावर त्या ठिकाणी सरकार विरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.  राज्यात भाजपची सत्ता असताना पूर्व नागपुरातील खुल्या मैदानावरील धार्मिक स्थळ पाडली जाणे ही दुर्दैवी बाब आहे. कारवाई थांबवली गेली नाही तर  काँग्रेस या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

बंटी शेळकेंची महाआरती

नागपूर शहर युवक काँग्रेसने नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली महालमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या मध्ये असलेले खांब हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. मात्र ते कायम आहे. धार्मिक स्थळे हटवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यावरील विद्युत खांबाला विद्युत बाबा असे नाव देत महाआरती करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या १७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

तात्या टोपे नगरात आज महाआरती

धार्मिक स्थळे पाडण्याला विरोध म्हणून आता ठिकठिकाणी आंदोलने होऊ घातली आहेत.  तात्या टोपे नगरातील गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्या, मंगळवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला नागरिकांनी उपस्थित राहून अतिक्रमण कारवाईला विरोध करावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

भाजपचे डोके ठिकाणावर आहे का? -सेनाड

अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे आश्वासन देणारे भाजपचे सरकार शहरातील गल्लीबोळातील धार्मिक स्थळावर बुलडोजर चालवत आहे. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आरोप करत लोकजागृती मोर्चाचे अ‍ॅड. रमन सेनाड यांनी  केला.  ही कारवाई थांबवली नाही  तर शहरातील नागरिक १ ऑगस्टला अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध करत रस्त्यावर येतील, असा इशारा त्यांनी दिला. या लोकमोर्चा संघटनेत हिंदू महासभा, शिवप्रतिष्ठान, शिवराज्यभिषेक सोहळा समिती, विश्वमैत्रीय बौद्ध संघटना, परशुराम महाराष्ट्र ब्राम्हण सभा, सनातन संस्था, बहुजन हिताय, शहर सुधार समिती, ज्येष्ठ नागरिक मंडळाचा समावेश आहे.

लोकसंतापाला भाजप जबाबदार -लोंढे

प्रार्थनास्थळावरून निर्माण झालेल्या संतापाला भाजपचे नेते जबाबदार आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन न्यायालयाने वेळीच सूचित केल्यानंतरही महापालिका प्रशासनाने योग्य पावले न उचलल्याने सध्या १२०० पेक्षा अधिक प्रार्थनास्थळावर बुलडोजर चालवले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. राजकारणासाठी देवी देवताचा उपयोग करणे भाजपची संस्कृती आहे. निवडणुकीत रामाला ओढणारे  भाजपचे नेते निवडणुकीनंतर मात्र आश्वासने विसरतात. नेत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धार्मिक स्थळावर बुलडोजर चालवले जात आहे. योग्य वर्गवारी करून न्यायालयात बाजू मांडली गेली असती आणि आराखडा मंजुरीची संधी अधिकाऱ्यांनी दिली असती तर आजचा उद्वेग टाळता आला असता. त्यामुळे धार्मिक स्थळ पाडणे हे भाजपचे पाप असल्याची आरोप लोंढे यांनी केला.