कामगिरी सुधारण्यासाठी दबावतंत्राचा वापर

प्रभागातील विकास कामांकडे झालेले दुर्लक्ष, त्यातून निर्माण होणारी नाराजी आणि त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला जाणारे तडे लक्षात घेऊन भाजपने पक्षाच्या सर्व नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील महापालिकेत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. १५१ पैकी १०८ जागा पक्षाकडे आहेत आणि चार नामनिर्देशित सदस्य असे ११२ सदस्य आहेत. यापैकी बहुतांश सदस्य हे प्रथमच निवडून आले आहेत. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता असल्याने भाजपकडून लोकांना शहर विकासाबाबत मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, याबाबत त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये नगरसेवकांबाबत तीव्र नाराजी आहे. त्याचा फटका पक्षाच्या प्रतिमेवरही झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपला ही नाराजी परवडणारी नसल्याने पक्षाने याची वेळीच दखल घेऊन पावले उचलायला सुरुवात केली आहे. नगरसेवक म्हणून असलेली सुमार कामगिरी आणि त्याविरोधात निर्माण झालेला जनाक्रोश लक्षात घेऊन भाजपच्या सुकाणू समितीने नगरसेवकांना राजीनामे मागण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू समितीची नगरसेवकांबरोबर पक्ष कार्यालयात बैठक झाली. त्यात शहरातील विविध विकास कामांसह नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. निष्क्रिय नगरसेवकांबाबत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांवर पक्षाची पकड कायम राहावी म्हणून दबावतंत्राचा वापर करीत सर्व नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याचा निर्णय बैठकीत झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके २७ जानेवारीला राजीनामा पत्र देतील आणि त्यानंतर सर्व सदस्य सत्तापक्षाकडे पत्र सोपवणार आहे. महापालिकेत विविध विषयाच्या समिती सभापतीच्या कामकाजासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. स्थायी समितीच्या आठ सदस्यांचे गेल्या आठवडय़ात राजीनामे घेण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये सत्ता स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नियोजित कार्यक्रमानुसार ही बैठक होत असते. पक्षाच्या नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात येणार असले तरी त्यांचा नगरसेवकांच्या कामकाजाचा काही संबंध नाही. मार्चनंतर पुन्हा नव्याने नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी राजीनामा पत्र घेऊन ठेवण्यात आले आहे.

गिरीश व्यास, प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष