News Flash

भाजपच्या मत विभाजनाच्या राजकारणाला काँग्रेसचा दे धक्का

भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला टक्कर देण्याची तयारी केली आहे.

भाजपच्या मत विभाजनाच्या राजकारणाला काँग्रेसचा दे धक्का

बौद्ध, मुस्लीम समाजाच्या मत विभाजनाचे राजकारण करून गेली दहा वर्षे नागपूर महापालिकची सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने आता सर्वच जाती, धर्म आणि भाषेच्या लोकांना पक्षाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देऊन भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला टक्कर देण्याची तयारी केली आहे.

काँग्रेसने सर्वधर्मसमभाव बाणा दाखवून देण्यासाठी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात बौद्ध, मुस्लीम, हिंदी भाषक, मराठी चेहऱ्यांना संधी दिली आहे. एवढेच नव्हेतर गेल्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या पण, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांची मते घेणाऱ्या उमेदवाराला कार्यकारिणीत घेण्यात आले आहे. सहा मतदारसंघातील विविध जाती, धर्माच्या कार्यकर्त्यांना अशाचप्रकारे नेमले आहे. बहुजन समाज पक्ष, बौद्ध, मुस्लीम तसेच ओबीसी मतदारांच्या पाठबळावर आपली ताकद वाढवत असताना काँग्रेसनेही या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे.

एकेकाळी मुस्लीम, बौद्ध, उत्तर भारतीय समाजातील मतांच्या जोरावर नागपूरच्या राजकारणात वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेसने गेव्ह आवारी, हुसेन शेख आणि जयप्रकाश गुप्ता अशा विविध धर्मातील व्यक्तींच्या हाती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. अलीकडच्या काळात विकास ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी  सोपवण्यात आली आहे. त्यांनी शहर उपाध्यक्ष, सरटिणीस, सचिव आणि संघटन सचिव निवडताना विविध जाती, धर्माच्या कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. ठाकरे हे महापालिकेत विरोधी पक्ष नेते असून अगदी सुरुवातीपासून महापालिकेच्या गैरकारभाराकडे बोट दाखवून भाजपला ‘लक्ष्य’ करत आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेवरून दूर करायचे असल्याने आक्रमकपणे भाजपविरोधात लढणाऱ्या ठाकरे यांना प्रदेश काँग्रेसने मोकळीक दिली आहे.

महापालिका निवडणुकीला सहा महिने असताना काँग्रेसने शहर कार्यकारिणी जाहीर केली. तब्बल अडीच वर्षांनी जाहीर झालेल्या कार्यकारिणीवर काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. सर्वसमावेशक कार्यकारिणी असल्याने आणि पक्षातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षात सामावून घेण्याची पक्षाची ताकद वाढवण्याचे असल्याने पक्षांर्तगत वाद चव्हाटय़ावर आल्यावरही पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ते फारसे गांर्भीयाने घेतले नाही. काँग्रेसने सहाही मतदारसंघातील विविध जाती, धर्म आणि भाषेच्या व्यक्तींना शहर उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि संघटन सचिव या सारखी पदे दिली आहेत. ब्लॉक अध्यक्ष बदलेले असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप मुस्लीम, बौद्ध आणि ओबीसी मतांच्या विभाजनावर जोरावर सत्ता काबीज करीत असल्याने मतविभाजन होऊ नये म्हणून संबंधित जाती, धर्माच्या स्थानिक नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. सर्व धर्माच्या लोकांना कार्यकारिणीत स्थान

पुन्हा भाजपवर टीकास्त्र

काँग्रेसचे ज्येष्ठ विलास मुत्तेमवार यांच्यावरील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टीकाला प्रतिउत्तर देताना विकास ठाकरे यांनी गडकरी आणि भाजपवर हल्लाबोल केला. नागपूर शहरासाठी काँग्रेसने अनेक योजना आणल्या. विलास देशमुख मुख्यमंत्री असताना आयआरडीपीसाठी साडेतीनशे कोटी रुपये दिले होते. तसेच गोसीखुर्द प्रकल्प, मिहान प्रकल्प काँग्रेसमुळे आले. मेट्रो रेल्वेचा आराखडा काँग्रेसने तयार केला होता. भाजपच्या नावावर स्टार बस घोटाळा आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी हे लोक जबाबदार आहेत. कंत्राटदारांना वाचवण्यासाठी चौकशीचा फार्स करत आहेत, अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:19 am

Web Title: bjp vs congress in nagpur
Next Stories
1 संघाच्या आशीर्वादासाठी भाजप इच्छुकांची शाखांमध्ये गर्दी
2 गणरायाला निरोपाची तयारी
3 स्वामी विवेकानंद स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात
Just Now!
X