जुन्या वादाचे पर्यवसान
नागपूर : कुख्यात गुंडावर गोळीबार करणाऱ्या दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. मुस्तफिकखान मोहम्मद ऊर्फ मुशफीक शकीलखान (३५) रा. कपिलनगर आणि कामराज वकील अहमद मुश्ताक (२४), अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत.
जुन्या वैमनस्यातून गुन्हेगार मोहसीन अहमद (३९), रा. जाफरनगर याच्यावर सोमवारी पहाटे ५ वाजता गीतांजली चौकात गोळीबार करण्यात आले. मोहसीन व मुशफीक दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. दोघांमध्ये पहिल्यांदा २०१५ मध्ये वाद झाला होता. तेव्हापासून दोघे कट्टर वैरी झाले.
गतवर्षीही वर्चस्वाच्या वादातून दोघे समोरासमोर आले. एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, गेल्या २० दिवसांपूर्वी मोहसीन याने मुशफीक याला ठार मारण्याची धमकी दिली होती. मोहसीन हा ठार मारेल, अशी भीती मुशफीकला होती. सोमवारी पहाटे मुशफीक, कामराज,अल्ताफ व त्याचे साथीदार कारने गीतांजली चौकात आले.
त्यांनी मोहसीन याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. पहिली गोळी त्याच्या कानाजवळून गेली. त्यानंतर मुशफीक याने दुसरी गोळी झाडली. ती मोहसीनच्या उजव्या मांडीत घुसली. हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणघातक हल्लय़ाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात तहसील पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. रात्री पोलिसांनी गार्ड लाईन परिसरात मुशफीक व कामराज या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून कार व पिस्तूल जप्त केली.
