पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार

बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित नागपूर परिसरातील तीन स्थळांना एकत्रित जोडून ‘बुद्धिस्ट सर्किट’ विकसित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिलला त्याचे भूमिपूजन करणार आहेत.

भारत सरकारच्या ‘स्वदेश दर्शन बुद्धिस्ट सर्किट’ अंतर्गत नागपुरातील जगप्रसिद्ध दीक्षाभूमी, कामठीतील ड्रॅगन पॅलेस व बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली या तीन स्थळांना एकत्रित जोडून त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ९९ कोटी ९१ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षांत अंदाजे २० कोटी खर्च करण्याची तरतूद केली आहे. १४ एप्रिलला खुद्द पंतप्रधानच नागपुरात येत असल्याने त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. बुद्धिस्ट सर्किटमुळे देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांना नागपुरात आल्यावर महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देणे शक्य होणार आहे.

चिंचोली वस्तुसंग्रहालय

मौजा चिंचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिवंगत सहकारी वामनराव गोडबोले यांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण व परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. दिवंगत वामनराव गोडबोले यांच्या मालकीच्या चिंचोली येथील ११.५० एकर जागेवर वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण, बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटर,  विपश्यना केंद्र यासह इतरही कामांसाठी ४० कोटी ७६ लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता शासनाने प्रदान केली आहे. सदर प्रकल्पांतर्गत २०१७-१८ या अर्थसंकल्पामध्ये १७ कोटी खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

कामठीतील ड्रॅगन पॅलेस

  • ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे नागपूरजवळील कामठी येथे आहे. जपान येथील मदर नोरिको ओगावा सोसायटीच्या मदतीने हे टेम्पल उभारण्यात आले आहे.
  • सुमारे दहा एकरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट प्रार्थना केंद्र आहे. पहिल्या मजल्यावरील विपश्यना सभागृहात बुद्धाची भव्य मूर्ती आहे.
  • ही मूर्ती चंदनाच्या एकाच लाकडापासून तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या इमारतीला उत्कृष्ट बांधकामाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. येथे दररोज मोठय़ा संख्येने लोक येत असतात.

देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेली दीक्षाभूमी

  • दीक्षाभूमी हे देशातील नव्हे तर जगातील बौद्ध धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
  • त्यानंतर त्यांनी सुमारे पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. देश-विदेशातील लाखो लोक येथील पवित्र स्तुपाला भेट देतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतात.
  • अशोक विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी येथे मोठय़ा संख्येने लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात. राज्य सरकारने दीभाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे.