News Flash

तीन दिवसांपासून बससेवा ठप्प

नवीन बस सेवा सुरू करताना जुन्या कंपनीशी संपूर्ण हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही

ऐन परीक्षेच्या काळात पासधारक विद्यार्थ्यांची गैरसोय; महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेतील घवघवीत यश भाजपच्या डोक्यात शिरले असून गत तीन दिवसांपासून ठप्प असलेल्या शहर बस वाहतुकीमुळे सामान्य नागरिक आणि पासधारक विद्यार्थ्यांची गैससोय होत असतानाही त्याबाबत ठोस पावले उचलण्यात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकामंध्ये रोष आहे.

नवीन बस सेवा सुरू करताना जुन्या कंपनीशी संपूर्ण हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही, त्यामुळे नवीन बसेस चालविण्यास जुनी कंपनी वंश निमयच्या चालक व वाहकांनी नकार दिला व दुसरीकडे नवीन कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यांना शहराची माहितीही नाही, त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरबस सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा परीक्षेच्या काळात पासधारक विद्यार्थी आणि चाकरमान्यांना बसत आहे. मात्र, त्याची साधी दखलही अद्याप सत्ताधारी भाजपने घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेची बससेवा वंश निमय कंपनीकडे होती. ते नीट जबाबदारी पार पाडू न शकल्याने नवीन कंपनीकडे १ मार्चपासून सूत्रे दिली. शहरात पूर्वी २३० बसेस धावत होत्या नवीन ंकपनीने फक्त १३० बसेस सुरू केल्या. परिणामी अनेक भागात बसेस पोहोचल्याच नाही. त्यामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू झाले.

विशेषत कोराडी, कामठी, हुडकेश्वर या भागात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आणि चाकरमानी या बसने प्रवास करतात. तीन दिवसांपासून त्यांचे कमालीचे हाल सुरू आहे. ऑटोचालकांनी त्यांचे दर वाढविले. वंश निमय कंपनीकडून विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या पासेस नव्या ऑपरटेरने स्वीकारल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांजवळ पैसे नसल्याने त्यांची गैससोय झाली.

महापालिकेने नवीन ऑपरेटरकडे व्यवस्था सोपविली. मात्र, नवीन कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना शहरातील रस्ते माहिती नसल्यामुळे काही ठिकाणी घोळ झाला. वंश निमय कंपनीचे चालक व वाहक यांच्या वेतनाचा प्रश्नाबाबत नवीन ऑपरेटरच्या माध्यमातून अजून तोडगा निघाला नाही त्यामुळे कंपनीचे अनेक ते कामावर नव्हते. त्यांनी तर काही भागात बसेस अडवून प्रवाशाला उतरवून दिले त्यामुळे ऐनवेळेवर अनेक लोकांना जादा पैसे देऊन ऑटोने जावे लागले. वंश निमय कंपनीकडून बसची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेच्या परिवहन विभागाकडून करण्यात येत असला तरी अजूनही अनेक बसेस कंपनीकडे आहेत.

सेवेत वेतनाचा अडथळा

शहरात स्कॅनिया कंपनी ग्रीन बस चालविणार असून ट्रॅव्हल्स टाईम कार रेंटल प्रा. लि. पुणे, श्यामश्यामा सव्‍‌र्हिस सेंटर दिल्ली, स्मार्ट सिटी बससेवा नागपूर या तीन कंपन्यांना नव्याने बससेवा चालविण्याचे कंत्राट देण्यात आले असून त्यांच्याशी करार करण्यात आला आहे. जुन्या वंश निमय कंपनीकडे १५०० कर्मचारी कार्यरत होते. यापैकी चालक,वाहक व देखभाल  विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या १२०० इतकी होती. तर ३०० कार्यालयीन कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये प्रमाणे वेतन द्यावे, असे परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढले होते. दरम्यान, वंश निमय कंपनी सोबतचा करार संपवून नवीन ऑपरेटरसोबत करार करण्यात आला. करार करताना महापालिकेने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची कुठलीही अट घातली नाही. त्यामुळे नवीन कंपनी या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास तयार नाही. त्यामुळे शहरात गेल्या तीन दिवासांपासून परिवहन व्यवस्था कोलमडली आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने वंश निमय कंपनीकडून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरात २५० पैकी केवळ १३० बसेस धावत होत्या. तिसरा दिवस असल्यामुळे नियमित बससेवा सुरू करण्यास किमान पाच ते सहा दिवस

लागतील. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असताना जुन्या पासेस नव्या ऑपरेटकडे चालतील असे निर्देश नव्या कंपनीला देण्यात आले आहे. शहरातील काही भागात बसेस धावल्या नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे मात्र लवकरच परिस्थिती निवळेल. जुन्या कंपनीतील चालक आणि वाहक यांना नव्या ऑपरेटकडे कामावर घेण्यात येत आहे.

शिवाजी जगताप, परिवहन व्यवस्थापक महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:14 am

Web Title: bus service stuck in nagpur
Next Stories
1 महापालिकेत महिलांसाठी स्वतंत्र कक्ष
2 काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा राजीनामा
3 विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहा!
Just Now!
X