उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

शहरातील ८६ चौकांच्या मधोमध वाहतूक बुथ निर्माण करण्यात यावे. बांधकाम करण्यापूर्वी इतर शहरांमधील वाहतूक बुथचा अभ्यास करून आराखडा उच्च न्यायालयात सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिले.

शहरातील वाहतूक व्यवस्था व अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. यावर सुनावणीदरम्यान डिसेंबर २०१८ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२ हजार ७६१ जणांवर कारवाई करण्यात आली. प्राणांतिक अपघातांमध्येही घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये अपघातांत  २५२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या १३ ने कमी झाली. १ जानेवारी ते २८ ऑगस्टपर्यंत मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या १३ हजार ७७१ जणांवर कारवाई करण्यात आली. याच कालावधीमध्ये वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यासाठी ७४ हजार ७७१ जणांवर कारवाई केल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. बुथचा आराखडा न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयीन मित्र म्हणून श्रीरंग भांडारकर, महापालिकेकडून अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

२१७ बेवारस कार रस्त्यांवर

शहरातील विविध भागांचा अभ्यास केला असता २१७ बेवारस कार रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून उभ्या असल्याची माहिती विभागीय समितीने दिली. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या मालकांवर दुपटीने दंड आकारण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.