समाधान शिबिरात दोन हजारांवर तक्रारींची नोंदणी

समाधान शिबीराच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण—पश्चिम विधानसभा मतदार संघातील दोन हजारावर नागरिकांनी त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अर्जाची नोंदणी केली आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री समाधान नोंदणी शिबिराला भेट देऊन शासनाच्या २३ विभागातर्फे तक्रार नोंदणी तसेच योजनांच्या लाभासाठी सुरु केलेल्या विशेष नोंदणी केंद्रांना भेट दिली. नागरिकांशी संवाद साधून समाधान शिबीराच्या माध्यमातून सर्वांचे समाधान करण्याविषयी आश्व्स्त केले.

सिव्हील लाईन येथील हैद्राबाद हाऊस या मुख्यमंत्री सचिवालयाच्या परिसरात दक्षिण—पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच लाभार्थ्यांंना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज स्वीकारून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.

शिबीरात मागील पाच दिवसात २ हजार ३०८ नागरिकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ३२६ विविध विभागांशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी २२४१ अर्जांचा निपटारा करण्यात आला असून २५ तक्रारी संदर्भातही तक्रारदारांचे समाधान करण्यात आले आहे. शिबीरामध्ये आज ११६ तक्रारी दाखल झाल्या असून ८४० नागरिकांनी नोंदणी करून विविध योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक नवीन आधार कार्ड व आधार कार्डच्या दुरुस्तीच्या अर्जांचा समावेश आहे. त्यासोबत प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे विविध प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड, मतदार नोंदणी, जिल्हा अग्रणी बँक, कामगार विभागामार्फत बांधकाम मजूराची नोंदणी, जन्म—मृत्यु, समाजकल्याण विभागाच्या योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, आरोग्य विभागाशी संबंधित असलेले रक्तगट प्रमाणपत्र अर्ज प्राप्त झाले आहेत.

वैयक्तीक तसेच सामुहिक विकासाची कामे तसेच त्या अनुशंगाने तक्रारी समाधान शिबीरामध्ये प्राप्त होत आहेत. त्यामध्ये नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, म्हाडा, वीज वितरण कंपनी, एसएनडीएल, अन्न व नागरी पूरवठा, नगर भूमापन, संजय गांधी निराधार योजना आदी विभागाच्या तRारीचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेण्यात येऊन त्या सोडविण्यासाठी विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री समाधान शिबीरामध्ये प्रशासनासंदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज स्वीकारण्याची सूविधा हैद्राबाद हाऊस येथे करण्यात आली आहे. १७ एप्रिलपर्यत सकाळी १० ते ५ वाजेपर्यत सर्व नागरिकांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था आहे. र्ज स्वीकारण्यासाठी व अर्जाची नोंदणी करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, शशांक दाभोळकर, प्रा. राजीव हडप, सत्तापक्ष नेता संदीप जोशी व त्यांच्या सोबत सर्व नगरसेवक, छोटू खांडवे, कल्पना तडस, सुरेंद्र पांडे, श्रीपाद गोरीकर, रमेश भंडारी, अनुसया गुप्ता, आशिष पाठक, सचिन कारळकर आदी सहकार्य करीत आहेत.