नागपूर : उपराजधानीचे किमान तापमान पुन्हा एकदा ७.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अवकाळी पावसानंतर दोन दिवस होत नाही तोच शनिवारपासून शहरात थंडीचा कडाका वाढला. तापमान तब्बल ४.१ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. मात्र, हवामान अभ्यासकांनी पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने तापमान पुन्हा एकदा वाढू शकते. या चढउताराचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यापासून सातत्याने किमान तापमानात वेगाने बदल होत आहे. दिवाळीनंतर नागरिकांना थंडीसाठी डिसेंबर उजाडण्याची वाट पाहावी लागली. पुढे ते इतके घसरले की ५.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यानंतर मात्र तापमानात चढउतार सुरू झाला.

पण ३१ डिसेंबरपासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्य़ात पावसाने हजेरी लावली. दोन दिवस पाऊस तळ ठोकून होता. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा थंडीचा ज्वर चढायला लागला आहे. शनिवारपासूनतच किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली.

रविवारी त्यात चांगलीच घट झाली, पण मंगळवारपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तापमान पुन्हा कमी होईल. पण थंडी आणि पावसाच्या या खेळात शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचवेळी नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. थंडीचा आस्वाद घेण्याआधीच पाऊस येत असल्याने यंदा पावसाळ्यासोबत हिवाळ्याचा अनुभव येत आहे.

रविवारी विदर्भात ७.९ अंश सेल्सिअससह सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूर शहरात झाली आहे. त्यापाठोपाठ गोंदिया ९.०, अकोला ९.१ तर ब्रम्हपुरी येथे ९.४ अंश   सेल्सिअस  किमान तापमान होते.