केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, जिव्हाळा पुरस्कारचे वितरण

विलास फडणवीस हे संघाचे समर्पित कार्यकर्ते होते. ते नि:स्वार्थ भावनेने काम करीत राहिले. परंतु राजकारणात अनेकजण चमकोगिरी करीत असतात. तेथील जिव्हाळा अनेकदा कृत्रिम असतो. परंतु राजकीय नेत्यांचा कार्यकर्त्यांशी नैसर्गिक जिव्हाळा असायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुवारी सायंटिफिक सोसायटी सभागृहात जिव्हाळा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, डॉ. विलास डांगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात वेद विद्या वर्धनी गुरुकुलमचे प्रमुख वेदशास्त्री विवेक रमेश पांढरीकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम विलास फडणवीस यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. गडकरी पुढे म्हणाले, विलास फडणवीस यांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. ते दलित, पीडित, शोषित, गरिबांच्या घरी जाऊन जिव्हाळ्याचे संबंध स्थापित करण्यात तज्ज्ञ होते. मात्र, त्याची त्यांनी कधी प्रसिद्धी केली नाही. आमच्या राजकारणात मात्र अनेकजण चमकोगिरी करीत असतात. येथील जिव्हाळा अनेकदा कृत्रिम असतो. कार्यकर्त्यांसोबत नैसर्गिक जिव्हाळा नसतो. कार्यकर्त्यांना गुणदोषासह  स्वीकारले पाहिजे. त्यांचे दोष कमी करून सकारात्मकता वाढण्याचे काम संघटनचे असते. असेच काम विलास फडणवीस यानी केले. ते जाती-धर्मानुसार भेदभाव करीत नव्हते. विचारधारेपेक्षा जिव्हाळा महत्त्वाचा असे त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येत होतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गैरसमज असल्याच्या काळात त्यांनी काम केले. आतासारखे संघाला त्यावेळी काम करणे सहज शक्य नव्हते. संघाला जातीवादी ठरवून दूर करण्याचे काम त्या काळी केले जात होते. अशा कठीण समयी त्यांनी संघाचे काम पुढे नेले, असेही ते म्हणाले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नितीन गडकरी यांच्या ‘‘विचारधारेपेक्षा जिव्हाळा महत्त्वाचा’’ या वाक्याचीच री ओढली. ते म्हणाले, संघाची विचारधारा आणि जिव्हाळा हे दोन वेगवेगळे विषय नाही.  जिव्हाळ्याचे नातेसंबंध जोडण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतो. याच पद्धतीने संपूर्ण हिंदू संघटित होईल आणि तो  जगाला आपल्या कवेत घेईल, असेही भागवत म्हणाले.

‘आठव विलासजींचा’चे प्रकाशन

यावेळी ‘आठव विलासजींचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिव्हाळा पुरस्काराने श्री वेद विद्या संर्वर्धीनी गुरुकुलमचे संस्थापक विवेक पांढरीकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पांढरीकर हे विद्यार्थ्यांना नि:शुल्क वेद शास्त्राचे शिक्षण देत आहेत.