आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झोन सभापती अर्थात मिनी महापौरपदासाठी भाजप समर्थितनागपूर विकास आघाडीमध्ये चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. शेवटचे वर्ष असल्यामुळे आणि सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सभापतीपद मिळविण्यासाठी सदस्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुक नगरसेवकांनी त्यासाठी वाडा आणि बंगल्यासह वरिष्ठांची मनधरणी सुरू केलीआहे. पुरेसे संख्याबळ असल्यामुळे दहाही झोनवर आमचा ताबा राहील, असा दावा सत्तापक्षाकडून केला जात असला तरी हे पद सत्ताधाऱ्यांना मिळू नये यासाठी अपक्षांना हाताशी धरून विरोधकांनी मोर्चेबाधणी सुरू केली आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीचा सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेचे दहा झोन आहेत. हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन वस्त्यांचा महापालिकेत समावेश करण्यात आल्यामुळे विकासाच्या दृष्टीने झोनची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती, परंतु सर्व शक्यतांना बगल देत दहा झोनमधील सभापतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. झोनच्या विकासासाठी स्वतंत्र निधी असतो त्यामुळे झोन सभापतींना मिनी महापौर दर्जा देण्यात आला आहे.
निवडणुकीसंदर्भात आयुक्तांनी परिपत्रक काढले असून त्यानुसार शनिवारी ३० एप्रिलला दहा झोनच्या सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक झोनसाठी अर्धा तासाचा वेळ ठेवण्यात आला आहे. २९ एप्रिलला उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करावे लागणार आहेत.
सध्या दहा झोनपैकी आठ झोन भाजपकडे आहेत. एका झोनवर मुस्लिम लिग तर दुसऱ्या झोनवर काँग्रेस लोकमंचचा सदस्य सभापती आहे. गेल्यावर्षी सभापतीपदावर भाजपच्या महिला गटाचे वर्चस्व होते.
आसीनगर झोनमध्ये बसपाचे नगरसेवक अधिक आहेत. मात्र, गेल्या वर्षी बसपाला झोन सभापतीपदापासून दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजप व विरोधात असलेल्या काँग्रेसने व्यूहरचना आखली होती. तसेच मुस्लिम लिगच्या इशरत नाहीद मोहमंद जलील यांना सभापतीपद देण्यात आले होते. मात्र, यावेळी बसपा आपली ताकद पणाला लावणार आहे. गेल्या काही दिवसात बसपामध्ये दोन गट पडले असून त्यांना एकत्र आणून यावेळी कुठल्याही परिस्थिती बसपाचा सभापती व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काँग्रेसशी त्यांची चर्चा सुरू आहे. मंगळवारी झोनमध्ये संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसचा उमेदवार झोन सभापतीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे झोन सभापतीपदी वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. ज्यांना आतापर्यंत महापालिकेत विविध पदे देण्यात आली आहे, त्यांना पुन्हा सभापतीपद देऊ नये असे सत्तापक्षाकडून प्रयत्न सुरू असले तरी काही वरिष्ठ सदस्य मात्र शेवटचे वर्ष असल्यामुळे सभापतीपदी आपलीच निवड व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. वरिष्ठ नेत्यांनी सभापतीसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी त्यावर अंतिम निर्णय कोअर कमिटी घेणार आहे.

विद्यमान झोन सभापती
* लक्ष्मीनगर झोन- जयश्री वाडीभस्मे
* धरमपेठ झोन- वर्षां ठाकरे
* हनुमानगर नगर- सारिका नांदूरकर
* धंतोली झोन- लता यादव
* नेहरुनगर झोन- मनीषा कोठे
* गांधीबाग झोन- प्रभा जगनाडे
* सतरंजीपुरा – रामदास गुडधे
* लकडगंज भाजप समर्थित शीतल घरत
* आसीनगर झोन – इशरत नाहीद मोहमंद जलील
* मंगळवारी झोन- राजू थुल