वाघाला त्याच्या अधिवासाच्या सीमा माहिती नसतात. पण,  त्या माहित असूनही स्थलांतरित वाघ आणि त्याच्या स्थलांतरण मार्गाकडे वनखात्याने केलेले दुर्लक्ष संघर्षांत परावर्तीत होत आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून वाघाची भ्रमंती सुरू आहे. या भ्रमंतीदरम्यान हा वाघ लोकांच्या नजरेस पडला आणि हजारोंच्या जमावाने त्याच्यावर दगडफेक केली. परिणामी वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले.

खरलांजी-वाराशिवणी हा उत्तर भ्रमणमार्ग (कॉरिडॉर) आहे. दरवर्षी या भ्रमणमार्गावरुन किमान तीन वाघ स्थलांतरित होतात. वर्षांनुवर्षे या मार्गावरुन वाघाला पाहिल्याचे परिसरातील गावकरीही सांगतात. तरीदेखील भ्रमणमार्गावर काम करणाऱ्या संस्था ते मानायला तयार नाहीत. मागील २०-२५ दिवसांपासून गोंदिया, बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यतील तुमसर परिसरात वाघ फिरत आहे. आठ जानेवारीला तो गोंदिया वनक्षेत्रात दिसून आला  तर ११-१२ तारखेला तो गोंदिया शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर होता. कान्हा-पेंच कॉरिडॉरमधील खरलांजी, वराशिवणी या परिसरात जन्मलेल्या वाघांची संख्या मोठी आहे. हा वाघही तिथलाच असण्याची दाट शक्यता आहे. नुकताच वयात आलेला  असल्याने तो नव्या अधिवासाच्या शोधात आहे. त्याची मूळ भटकंती ही रात्रीचीच आहे. आज तो अचानक लोकांना दिसला आणि हजारोंच्या जमावाने त्याच्यावर दगडफेक केली.

यादरम्यान जमावातील काही लोक त्याच्या मार्गात आल्यामुळे मध्यप्रदेशातील पंढरवाणी येथील शंकर तुरकरसह भंडारा जिल्ह्यतील गोंदखरी येथील छोटेलाल ठाकरे, सिंदपूरी येथील वीरेंद्र सहारे यांना त्याने जखमी केले.

आठ दिवसांपूर्वीच तुमसर परिसरात वाघाच्या हल्ल्यात एकजण जखमी झाला होता. त्यानंतरही वनखात्याने याची दखल घेतली नाही. स्थलांतरित वाघ आणि त्यांच्या भ्रमणमार्गाचे संवर्धन असेच दुर्लक्षित राहिल्यास संघर्ष वाढण्याची शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणारा जा सर्वात जुना भ्रमणमार्ग आहे. आजही वाघ त्याचा वापर करतात, पण यावर काम करणाऱ्या संस्था हे वास्तव स्वीकारत नाहीत. या भ्रमणमार्गाचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा स्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष किंवा  शेताच्या बाजूच्या वीजप्रवाह सोडलेल्या कुंपणामुळे वाघाच्या मृत्यूच्या घटना घडू शकतात.

-सावन बाहेकर, माजी मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया.